राम मंदिराचा निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनाही सोहळ्याचं निमंत्रण
अयोध्येत प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेला अवघे २ दिवस उरले आहेत. २२ जानेवारीच्या दिवशी हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमिवर या सोहळ्यासाठी देश-विदेशातल्या व्यक्तींना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. या सोहळ्याला काँग्रेसने येणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच शरद पवार यांनीही आपण 22 जानेवारीनंतर मंदिराचं काम पूर्ण झाल्यावर आपला दौरा नियोजित असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे जे पाच न्यायाधीश होते त्या सगळ्यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण धाडण्यात आलं आहे.
२२ जानेवारीला राम मंदिर उदघाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी काही राज्यांमध्ये सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी देशातील चित्रपट आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. त्या सोबतच सर्वोच्च न्यायालयाचे जे पाच न्यायाधीश होते त्यांनाही सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
राम मंदिर आणि बाबरी मशीद वादाची सुनावणी करणारे पाच न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद बोबडे, डीवाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर अशा पाचही न्यायाधीशांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे या पाच जणांनी रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला होता. ज्यानंतर मंदिर निर्मिताचा मार्ग मोकळा झाला. आता हे पाचही न्यायाधीश प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.