राज ठाकरेंच्या दोन जागेचा प्रस्ताव अमित शहांकडून फेटाळला...!
राज ठाकरे यांच्या दोन जागेच्या प्रस्तावावर, एक जागा देणे शक्य आहे असं म्हणत अमित शहांनी राज ठाकरेंचा दोन जागेचा प्रस्ताव फेटाळला.
देशाचं लक्ष सध्या दिल्लीकडे लागलं आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातही तसंच काहीसं चित्र आहे. मनसे नेते राज ठाकरे हे भाजप हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी मनसेसाठी मुंबईत दोन जागांसाठी (दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई) प्रस्ताव अमित शहा यांच्याकडे सादर केला होता. परंतु राज ठाकरेंचा हा प्रस्ताव अमित शहांनी फेटाळला आहे. केवळ एक जागा देणं शक्य असून दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहांनी राज ठाकरेंना सांगितलं.
बैठकीत नेमकं काय घडलं?
दिल्लीत अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट झाली पण त्या अगोदर राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. फडणवीसांच्या बैठकीत जवळपास निश्चित करण्यात आलं की, आता नेमकं पुढं कसं जायचं आहे, हे सगळं ठरल्यानंतरच राज ठाकरे दिल्लीला गेले. तिथे गेल्यानंतर अमित शहांसोबत आगामी लोकसभा निवडणूकांबाबत आणि युतीबाबत चर्चा झाली. सुरवातीला मनसेकडून तीन जागेंचा प्रस्ताव देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील बैठकीतच या तीन जागांसाठी राज ठाकरेंना स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्यानंतर अमित शहांसोबतच्या बैठकीतही राज ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तर शेवटी केवळ एक जागा देणं शक्य आहे, असं अमित शहा यांनी राज ठाकरेंना सांगितलं.
विधानसभा देखील एकत्र लढवूया: ते नियोजन पुढचं पुढं ठरवू
विधानसभेची निवडणूक देखील एकत्र लढवूया पण त्यावेळचं जागावाटपांचं नियोजन तेव्हाच ठरवु, असं अमित शहा म्हणाले. विशेष म्हणजे यापूर्वी उध्दव ठाकरेंसोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभा निवडणूकांसदर्भात बोलू, विधानसभेचं पुढचं पुढे ठरवू असं स्पष्ट शब्दात राज ठाकरेंना अमित शहा म्हणाले.