मोदीजी, महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात सह्दयता दाखवा, राज ठाकरेंची पत्रातून मागणी

Update: 2023-06-01 08:17 GMT

दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या महिन्याभराच कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतील मिळवलेले मेडल्स गंगा नदीत वाहण्यासाठी निघाले होते. मात्र, या वेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मध्यस्थी केली आणि मोदी सरकारला ५ दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं. आता या आंदोलनाच अनेकांनी समर्थन केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या आंदोलनाच्या अनुषंगानं खरमरीत पत्र लिहिलंय.

राज ठाकरे यांनी हे पत्र ट्विट केलंय. ते म्हणालेत 'सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः या विषयात लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं अशी विनंती ठाकरे यांनी मोदींना या पत्रातून केलीय.

राज ठाकरे पत्रात काय म्हणाले...

आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता 'प्रधानसेवक' या नात्याने आपण या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती. ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियाँ' असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत, असंही राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलंय.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि या लढाईत कोणाच्याही 'बाहुबला'चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे. याआधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे, तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे. म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल ? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दु:खाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर 'खेलो इंडिया' हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल याची मला खात्री आहे. आपण या विषयात लक्ष घालावं आणि या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदींचं याप्रकरणाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय.

असं पत्र लिहून राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले आहे. महिलां कुस्तीगीरांच्या आंदोलनात सरकार विरोधात राजकीय पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. या विषयावंर भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी महिला कुस्तीपटूंना समर्थन देत भाजपला घरचा आहेर दिला आहे. अशा पद्धतीनं महिला कुस्तीगीरांच्या या आंदोलनाला राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनही समर्थन मिळत आहे. त्यामुळं हे आंदोलन आता मोदी सरकारसाठी अडचण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे


Tags:    

Similar News