भोंगे उतरले नाही तर हनुमान चालीसा वाजवणारच... उत्तरसभेत राज ठाकरे ठाम

Update: 2022-04-12 15:34 GMT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात उत्तरसभा (Uttar Sabha) होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार, शिवसेना आणि विशेषत: शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तसेच मशिदींवरी भोंग्यांवरील त्यांच्या वक्तव्यावरही राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मशिदीचे भोंगे उतरले नाही तर हनुमान चालीसा वाजवणारच अशा ठणकाऊन इशारा राज ठाकरेंनी आज ठाण्यातील उत्तरसभेत दिला.

उत्तर सभा का?

सुरवातीलाच गुढीपाडव्याच्या सभेनंतर आलेल्या प्रतिक्रीयांवर बोलताना त्यांनी पत्रकार परीषद घेतली नाही कारण पत्रकार विषय भरकटवात म्हणुन उत्तरसभा घेतली असं राज ठाकरे सुरवातीलाच म्हणाले. ``गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जे तारे तोडले, ते पाहिल्यावर मला वाटलं याचं उत्तर तर दिलं पाहिजे. पण मला पत्रकार परिषदेत याचं उत्तर द्यायचं नव्हतं. कारण मी जर पत्रकार परिषद घेतली असती तर या सगळ्या पक्षांना बांधील जे पत्रकार आहेत, तेही त्यात शिरतात आणि मूळ विषय बाजूला राहून हे भलतीकडेच विषय भरकटवतात, असंही ते म्हणाले. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो आणि मातांनो… माझा आज भाषण करताना कदाचित टेबलफॅन होणार आहे असं राज ठाकरे सुरवातीलाच म्हणाले.

त्या दिवशीची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांशी संबंधित पत्रकारांनी आपापला कंडू शमवून घेतला. मग वाट्टेल ते बोललं गेलं. भाजपाची स्क्रिप्ट होती वगैरे. महाराष्ट्रात अनेक गुणी पत्रकार या भामट्या पत्रकारांमुळे एकटे पडलेत असंही ते म्हणाले.

भोंगा धार्मिक नाही सामाजिक विषय

राज ठाकरेंनी सभेत तीन व्हिडीओ दाखवत अजित पवारांवर टिका केली. ३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाही. आम्हाला त्याची इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. आज १२ तारीख आहे. १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी तुम्ही बोला, त्यांना सांगा, सगळे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत, ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही असे ते म्हणाले.

भोंग्याचा विषय धार्मिक विषय नसून सामाजिक विषय असं सागंत ते म्हणाले, ``वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सगळ्यांना याचा त्रास होतो. एक तर सगळे बेसूर असतात. रस्त्यावर घाण झाली, फुटपाथवर घाण झाली तर ते आपण साफ करतो. मग कानांना त्रास होत असेल, तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. राज्य सरकारला सांगतो, यातून मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. परदेशात अनेक ठिकाणी बंदी आहे, तिथे निमूटपणे ऐकता ना? माझ्या परिचयाची मुस्लीम लोकं येऊन सांगतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा कोणता धर्म आहे जो इतर धर्मीयांना त्रास देतो?``लॉकडाऊनमध्ये अजित पवारांचा कान साफ झाला असणार. गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला. मी चुकीचं काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा आख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय? तुम्हाला जी आजान द्यायचीये, ती घरात द्या. शहरांचे रस्ते, फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार असंही ठाकरेंनी सांगितलं.

मी आग लावणार नाही

व्यासपीठावर येताना मला अग्निशम दलाचा बंब दिसला. पण मी इतकी काही आगा लावणार नाही. आज दुपारी मी बसलो असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं किती वाजता निघणार आहात? म्हटलं का? तर म्हणे काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही त्यांना ताब्यात वगैरे घेऊ. मी म्हटलं निघेन तेव्हा कळवतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार आहे, हे इंटेलिजन्सला कळलं, पण पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरंतर त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते असंही राज ठाकरेंनी सांगितले.

मी ट्रॅक बदलला नाही

मला तेव्हा मोदींच्या काही भूमिका नाही पटल्या. तेव्हा मी उघडपणे बोललो. आता हे म्हणतायत, मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला. मला नाही गरज ट्रॅक बदलायची. आयएलएफएस कंपनीची चौकशी होती, कोहिनूरची, त्यातून मी एका वर्षात बाहेर पडलो होतो. म्हणजे कुणी व्यवसायही करायचा नाही का? त्यासंदर्भात मला ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना फक्त ईडीची नोटीस येतेय अशी चाहूल लागली होती. त्यावरून केवढं नाटक केलं. आणि या हातांनी काही पापच केलं नाही, तर नोटीस राजकीय असो की कुणाचीही असो, मी त्याला भीक घालत नाही असं राज ठाकरेंनी ठणकावलं.

शरद पवार ईडी कारवाईची यादी मोदींना देतात

भाषणानंतर काही प्रतिक्रिया आल्या. सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? महाराष्ट्रात एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला. देशमुख गेले, मग परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या. त्यानंतर परत भेट घेतली, नवाब मलिक फाजीलपणा करतोय. मग नवाब मलिक. नंतर आता संजय राऊतांवर बोलले असं म्हणे. आत काय बोलले माहीत नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की शरद पवार खूश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणारही नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय असं ठाकरे म्हणाले.

लोकसंख्येनं देश फुटेल

आजही माझं मोदींना सांगणं आहे. दोन मागण्या पूर्ण करा, खूप मोठे उपकार होतील. एक तर देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. आम्हाला आसूया नाही की आमच्याकडे एक आणि तुमच्याकडे पाच-पाच. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढतेय, हा देश एक दिवस फुटेल. या काही गोष्टी देशात होणं गरजेचं आहे. आवश्यक आहेत असं ठाकरेंनी स्पष्ट केलं.

अजित पवारांकडे रेड पडते. त्यांच्या सख्ख्या बहिणींकडे रेड पडते. त्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसे? मी कधी बघितलं नाही शरद पवारांना भडकलेले. मी उघडपणे बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या.

विझलेला पक्ष नाही

जयंत पाटील म्हणतात, हा विझलेला पक्ष आहे. जंतराव, हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. माझ्या अक्षरावर थोडं इकडे-तिकडे झालेलं असेल तर सांभाळून घ्या. हे काय मला सांगतात. यांच्या मतदारसंघाबाहेर यांना कुणी हुंगून विचारत नाहीत. मला सांगतात यांचे आमदार कुठे गेले. राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडून येणाऱ्या उमेदवारांची मोळी आहे. त्याची दोरी फक्त शरद पवार आहेत. ही माणसं दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेली, तरी निवडून येतील.जंत पाटलांना काहीही सांगा, चकित चंदू. एकदा मी सांगितलं बेहरामपाड्यात जाऊन बघा. गंभीर परिस्थिती आहे. तर म्हणे खरं की काय, मला काही माहितीच नाही. सतत चेहऱ्यावर आश्चर्य असतं. संपलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार? आरे येऊन बघा, हा काय संपलेला पक्ष आहे का?

भुजबळ म्हणाले, मीही मोदी-भाजपाविरोधात बोलत होते. पण मला झालेला त्रास मी सहन केला. त्यासाठी मी माझा मार्ग बदलला नाही. भुजबळ साहेब, तुमचा सीए, आणि तुमच्यासोबतचा एक माणूस यांनी केलेल्या गैरव्यवहारांमुळे तुम्हाला आत जावं लागलं. मोदींवर टीका केली म्हणून नाही जावं लागलं. सत्ता आल्यावर पहिला शपथविधी यांचा होतो. सगळे म्हणतायत संपलेल्या पक्षावर काय बोलायचं, तरी बोलतायत.

आमचे लाडके अजित पवार का म्हणतायत बघा. त्यांचा आवडता शब्द आहे पठ्ठ्या. यांना काय म्हणे भोंगे आत्ताच दिसले का. याच्याआधी म्हणे झोपा काढत होतात का? अजित पवार, मी कधी कुठली गोष्ट बोललोय, हे मला नीट आठवतंय. तुमच्या माहितीसाठी फक्त ३ व्हिडीओ आणले आहेत. मी याआधीही बोललो होतो. पण त्याचे मला काही व्हिडीओ सापडले नाहीत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो. तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं काही. त्यानंतर त्यांना कूSSS असा आवाज ऐकू येत नव्हता. त्यामुळे मी जे काही बोललो, ते त्यांना कळलंच नाही असं ठाकरे म्हणाले.

मुंब्र्यातून अटक अतिरेक्यांची यादी वाचली

२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकाना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्ट २०२० हिजबुल मुजाहिदिनी चार अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक झाली असं ठाकरेंनी सांगितलं.यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला असं ठाकरे म्हणाले.

जातीयवाद कोण भडकवतो ?

शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. बरं शरद पवारांनी सांगावं की राज ठाकरे त्याची भूमिका बदलतो? राष्ट्रवादी काँग्रेसनं हे बोलावं? परदेशी पंतप्रधान चालणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे पहिले होते. तो धागा पकडून शरद पवार ९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. दोन महिन्यांत भूमिका बदलली. शरद पवारांनी आत्तापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत. मी कोणती भूमिका बदलली? हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणलीये. पाकिस्तानी कलाकारांना ढुंगणावर लाथ मारू हाकलण्याची भूमिका घेणारा पक्ष कोणता होता? पाकिस्तानी कलाकारांना घ्याल, तर याद राखा ही नोटीस सगळ्या निर्मात्यांना कुणाकडून गेली होती? असा इशारा ठाकरेंनी दिला.

अफजलखान महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का?

शरद पवार भूमिका मांडताना म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. पण त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शरद पवार कधीही तुम्हाला छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुसलमान मतं गेली तर काय करायचं? म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाहीत. मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, मराठ्यांची माथी भडकवायची असतील… त्यांच्याच एका भाषणात अफजलखान इथे आला, तेव्हा महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता. तो हिंदू-मुस्लीम नव्हता म्हणे. मग तो आला कशासाठी होता? तो काय केसरी टूर्स, वीणा वर्ल्डचं तिकीट घेऊन महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का? असा सवाल ठाकरेंनी उत्तरसभेत उपस्थित केला.

पुरंदरे सॉफ्ट टार्गेट

बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय. तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. शरद पवारांकडे अनेक घेण्यासारखे गुण आहेत. पण याचं काय करायचं? असंही ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात जातीपातीचा चिखल

यांना यांचं जे राजकारण करायचं ते करू द्यात. पण बंधूभगिनींना माझी विनंती आहे की यातून बाहेर या. यातून आपल्या हाताला काहीही लागणार नाहीये. ही सगळी मंडळी फक्त तुमचा वापर करून घेतील. कुठे गेलं ते मराठा आरक्षण? लाखालाखाचे मोर्चे निघाले. काय झालं त्याचं? यांंना निवडणुकीसाठी फक्त तुम्हाला उचकवायचं होतं. त्यातून मतं पदरात पाडून घ्यायची होती. आता यांनी नवीन ओबीसी समाजाबद्दल काढलंय. ते कोर्टात गेल्यानंतर निवडणुका पुढे ढकलल्या. मग पालिकांवर प्रशासक नेमले. म्हणजे राज्य सरकार आणि पालिका प्रशासन यांच्याचकडे… दोन्ही बाजूंनी खा.. काय हा महाराष्ट्र आपला अशा शब्दात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर टीका केली.

भोग्यांच्या राजकारणाची गरज नाही

मला भोंग्यांचं राजकारण करायची गरज वाटत नाही. हा देश, महाराष्ट्र साफ झाला पाहिजे. इथली वयस्कर मुलं, लहान मुलं, अभ्यास करणारी मुलं यांना या भोंग्यांचा त्रास होता कामा नये. त्याच्यासाठी उद्या काही केसेस अंगावर घ्याव्या लागल्या, तर माझ्यासकट आम्ही सगळे घेऊ. माझ्यावर शंभर-सव्वाशे आहेतच. अस्वलाच्या अंगावर अजून एक केस आला तरी काय फरक पडतो.यांचं रोजचं चाललंय याला जेलमध्ये टाक, त्याला जेलमध्ये टाक. आम्ही सगळं विसरून गेलोय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरू झालंय असं ठाकरे म्हणाले.


ज्या मुसलमानांना त्यांच्या प्रार्थना करायच्या आहेत त्या घरात करा. प्रत्येकानं आपला धर्म घरात ठेवावा, रस्त्यावर आू नये. सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण समजू शकतो. पण ३६५ दिवस, २४ तास हे नाटक लफडं महाराष्ट्रात चालणार नाही. एक गोष्ट सांगतो. आत्ता हनुमान चालीसा सांगितलाय. पण माझ्या भात्यातला पुढचा बाण अजून मी काढलेला नाही. तो काढायला मला लावू नका. माझी राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की जिथे समाजाला त्रास होतोय, असा कोणताही धर्म असता कामा नयेत. आपल्याला तेढ, दंगली करायच्या नाहीत असं राज ठाकरेंनी शेवटी सांगितलं.

Full View

Tags:    

Similar News