महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जूनला जन्मदिवस असतो. त्यानिमित्त राज्याच्या कानाकोप-यातून मनसैनिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत दाखल होतात. यंदा मात्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटीसाठी वेळ देतानांच भेटवस्तूंऐवजी त्यांना कार्यकर्त्यांकडे वेगळीच मागणी केलीय.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाटी मुंबईत येतात. यावेळी होणारी भेट आणि शुभेच्छा हीच मोठी भेट असल्याचं ट्विट राज ठाकरे यांनी केलंय. याशिवाय मनसैनिक भेटायला येतांना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तूही घेऊन येत असतात, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
मात्र, यावर्षी १४ जूनला वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी येणा-यांना राज ठाकरेंनी आवाहन केलंय. यावर्षीपासून पुष्पगुच्छ, मिठाई किंवा कोणतीही भेटवस्तू आणू नका, अशी विनंतीच राज ठाकरे यांनी केलीय. कुणाला अगदीच काही आणावसं वाटत असेल तर त्यांनी येतांना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या, किंवा कुठलंही छोटसं शैक्षणिक साहित्य आणा, अशी विनंतीच त्यांनी केलीय. दरम्यान, कार्यकर्त्यांनी दिलेली झाडांची रोपं विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देण्यात येतील. त्याचप्रमाणे जे शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून मिळेल ते मनसे कडून गरजू विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात येईल. या विनंतीचा कार्यकर्ते मान ठेवतील, अशी खात्री असल्याचं राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलंय. दरम्यान, १४ जूनला सकाळी साडेआठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत राज ठाकरे मुंबईत कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील, असंही सांगण्यात आलंय.