राहूल गांधींचा आजपासून महाराष्ट्र दौरा : नंदूरबारपासून सुरूवात, तर मुंबईत होणार समारोप
खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात धडकणार असून ६ दिवसांत १३ मतदारसंघात त्यांचा दौरा होणार आहे. राज्यातल्या नंदूरबारपासून या न्याय यात्रेचा प्रारंभ होणार असून मुंबईल्या शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे.
ही भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी गुजरातमधल्या सोनगड मधून नंदूरबारमध्ये आज दाखल होईल. गावागावात स्वागत झाल्यानंतर ही यात्रा दुपारी १२ वाजेपर्यंत नंदुबारमध्ये येणार असून १२:३० वाजता खासदार राहूल गांधी हे सुरतमधून हेलिकॉप्टरने नंदूरबारात पोहचतील. वळण रस्त्याने ते थेट सी. बी. मैदानावरील सभेत दाखल होतील.
यादरम्यान त्यांचा रोड शो करण्यासंदर्भात सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे. या सभेच्या ठिकाणी गुजरातच्या काँग्रेस कमिटीकडून महाराष्ट्र काँग्रेस कमीटी यात्रेतील पक्षाचा झेंड्याचा स्वीकार करेल. याला प्लॅग सेरेमनी असे म्हटले जाते. त्यानंतर राहूल गांधी हे १० ते १५ मिनिटे उपस्थितांना सभेच्या व्यासपीठावरून संबोधित करतील. नंदूरबारमधला हा कार्यक्रम दिड ते दोन तासांचा असणार आहे. ही यात्रा दुपारी २ वाजता नेते मंडळींसह दोंडाईचाकडे प्रस्थान करेल, असं आमदार के. सी. पाडवे म्हणाले.
रविवारी खासदार राहूल गांधी यांचे खाजगी सचिव बैजू, भारत जोडो न्याय यात्रेचे समन्वयक एम. संदीप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी सभास्थळाची पाहणी केली. सोमवारी सकाळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एम. चन्नीथला, खासदार जयराम रमेश, खासदार के.सी. वेणूगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण इत्यादी नेते आज नंदूरबारात दाखल होणार आहेत.