Rahul Gandhi : राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाइल मध्ये केला बदल..
राहुल गांधी यांनी आज ट्विटरवर आपला बायो बदलला आहे. त्यांनी अपात्र खासदार असं लिहिलं आहे...
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे आज रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह करण्यात येत आहे. सकाळी १० वाजल्यापासून सर्व राज्यांतील जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर पक्षाचे बडे नेते आणि कार्यकर्ते निदर्शने करत आहेत.
सत्याग्रहादरम्यान प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधत आजपर्यंत ''आम्ही गप्प बसलो, तुम्ही आमच्या कुटुंबाचा अपमान करत राहिलात, मला विचारायचे आहे की तुम्ही माणसाचा किती अपमान कराल. माझ्यावर गुन्हा दाखल करा पण सत्य हे आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे असल्याचं म्हणत जोरदार टीका केली. हे सगळं होत असताना राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटरच्या बायोमध्ये बदल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या बायोमध्ये नक्की काय बदल केला आहे? वाचा..
ट्विटर बायोमध्ये लिहिलं 'Dis’Qualified MP'
खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल केला आहे. राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईलवर अपात्र खासदार असं लिहिलं आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हा बदल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये आता 'Dis’Qualified MP' असे पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी का रद्द झाली?
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक मधील कोलार येथे बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे नाव मोदी कसे असते. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी अशी नावं घेतली होती.
देशात आणखी शोध घेतला तर अनेक ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी सापडतील. यावेळी राहुल गांधी यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी हे चोर असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून सुरत पश्चिमचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यावर कलम ४९९ आणि ५०० (मानहानीचा खटला) खटला दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी तीन वेळा न्यायालयासमोर हजर राहिले. यात २०२१ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मी निर्दोष असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते.
काय होता आरोप?
राहुल गांधी यांनी आमच्या पूर्ण मोदी समाजाचा अपमान केल्याचा आरोप पुर्णेश मोदी यांनी केला होता. यानुसार न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यासंदर्भातील पत्र लोकसभा सचिवालयाने जारी केले. त्यानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
कोणत्या नियमानुसार राहुल गांधी यांची खासदारकी झाली रद्द?
सर्वोच्च न्यायालयाने १३ जुलै २०१३ रोजी लिली थॉमस प्रकरणात दिलेल्या निकालानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
लिली थॉमस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी एखाद्या गुन्ह्यात दोषी आढळला आणि त्याला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. एवढंच नाही तर शिक्षा पूर्ण केल्यानंतर संबंधित सदस्याला पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे लिली थॉमस प्रकरणाचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.