CBI च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा
जनतेच्या मनात सीबीआयबद्दल प्रचंड आदर आणि विश्वास होता. परंतू गेल्या काही वर्षांपासून सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, असं मत एन.व्ही. रमण्णा यांनी व्यक्त केले.;
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून बिगर भाजपशासित राज्यांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप यापूर्वी फक्त विरोधकांकडून केला जात होता. परंतु आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनीही केंद्रीय तपासयंत्रणा सीबीआयची कार्यपद्धती, कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा खळबळजनक विधान केलं आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये तपास यंत्रणा आणि पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.सत्ता आणि सत्ताधारी हे बदलत असतात परंतू एक संस्था म्हणून तुम्ही कायम तिथेच राहणार आहात असं विधान रमण्णा यांनी केलं आहे. ते नवी दिल्ली येथील १९ व्या डी.पी.कोहली स्मृती चर्चासत्रात बोलत होते.
"राजकीय सत्ता ही कालानुरुप बदलत असते, पण एक संस्था म्हणून तुम्ही कायम तिथेच राहणार आहात. त्यामुळे तुम्ही एक संस्था म्हणून अभेद्य आणि स्वतंत्र राहणं गरजेचं आहे. तुम्ही करत असलेल्या कामाशी एकजुट राहण्याची शपथ घ्या. तुमच्यातला बंधुभाव-एकता हीच तुमची ताकद आहे. सुरुवातीच्या काळात जनतेच्या मनात सीबीआयबद्दल प्रचंड आदर आणि विश्वास होता. परंतू गेल्या काही वर्षांपासून सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे," सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा म्हणाले.
सध्याच्या घडीला न्यायव्यवस्थेकडे एखाद्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी अनेक अर्ज दाखल होत आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये इतर संस्थेप्रमाणेच सीबीआयची विश्वासार्हता धोक्यात आली आहे, असंही रमण्णा म्हणाले. मला आठवत की काही वर्षांपूर्वी सीबीआयचे अधिकारी एखाद्या प्रकरणाचा तपास कऱण्याआधी पत्रकार परिषद घ्यायचे. परंतू सध्याच्या नेतृत्वाखाली सीबीआयचे अधिकारी आपला तपास लो-प्रोफाईल ठेवत आहेत, हे खरंच चांगलं आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.
CBI, ED, SFIO यासारख्या अन्य केंद्रीय तपासयंत्रणांना एका छत्राखाली आणणं गरजेचं असल्याचं मतही यावेळी रमण्णा यांनी बोलून दाखवलं. पोलिसांसह सर्व तपासयंत्रणांनी लोकशाही मूल्य बळकट करणं गरजेचं असल्याचं मतही रमण्णा यांनी बोलून दाखवलं. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह पश्चिम बंगालमध्ये सध्या केंद्रीय तपासयंत्रणांकडून होत असलेली कारवाई चर्चेचा विषय ठरत असतानाच सरन्यायाधीशांनी थेट सीबीआयच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने विरोधकांच्या आरोपाला बळकटी मिळाली आहे.