आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की, कतारकडून माफीची मागणी

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून देशात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत.;

Update: 2022-06-06 03:17 GMT

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरच्या चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त टिपण्णी केली होती. त्यामुळे देशात नुपुर शर्मा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे भाजपने नुपुर शर्मा यांचे ६ वर्षासाठी निलंबन केले. मात्र तरीही हा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. तर या प्रकरणामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात नाचक्की होत असल्याचे समोर आले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशात संताप व्यक्त केला जात असतानाच अरब देशांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर कतार सरकारने भारताच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याकडे पत्र देत नुपुर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. याबरोबरच भारत सरकारने या प्रकरणावरून माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

कतारने परराष्ट्र खात्याच्या दीपक मित्तल यांना पत्र दिल्यानंतर दीपक मित्तल यांनी वैयक्तिक टिपण्णीला देशाची भुमिका मानू नये, असे मत व्यक्त करत दीपक मित्तल यांनी भारताची भुमिका स्पष्ट केली.

नुपुर शर्मा यांच्या निलंबनाचे स्वागत मात्र माफीची मागणी

भाजपने नुपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र कतारचे परराष्ट्र मंत्री सुल्तान बिन साद अल मुरैखी यांनी परराष्ट्र खात्याचे दीपक मित्तल यांच्याकडे निवेदन देत या वक्तव्याचा भारत सरकारने निषेध करावा आणि अशा वक्तव्याबद्दल भारताने माफी मागावी, असे मत व्यक्त केले आहे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे अल्पसंख्यांकाविरोधातील हिंसा वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. तर नवीन कुमार जिंदाल आणि नुपुर शर्मा यांच्या निलंबनाचे कतारने स्वागत केले आहे.

कतारने निवेदनात काय म्हटले आहे?

कतारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरातील २ अब्ज मुस्लि हे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांवर चालतात. त्यामुळे भारतातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अशा प्रकारे केलेले वक्तव्य मुस्लिम समुदायाचा अपमान करणारे आहे. कतार सर्व धर्मांप्रती आणि देशांतील नागरिकांप्रती समान मुल्यांचा आणि सहिष्णूतेचा अवलंब करते. त्यामुळे या वक्तव्याबद्दल भारताने निषेध नोंदवावा आणि माफी मागावी.

भारतीय राजदुतांनी दिले उत्तर

नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे परराष्ट्र खात्याचे दीपक मित्तल यांनी अधिकृतरित्या भारताची भुमिका स्पष्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, कोणत्याही व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या व्यक्तीकडून वैयक्तिकरित्या करण्यात आलेल्या वक्तव्याशी भारत सरकारचा संबंध नाही. भारत सरकार हे संविधानावर चालते. तसेच एकतेवर विश्वास ठेवते. त्यामुळे अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी भुमिका मांडली.

नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यावरून इतर देशांनीही व्यक्त केली नाराजी

नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून कतारपाठोपाठ ओमानचे ग्रँड मुफ्ती यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून इराण आणि कुवैतनेही नाराजी व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतावर दबाव वाढत आहे. तर भारताने माफी मागावी अशी मागणी अरब देशांतून केली जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला नाचक्कीला सामोरे जावे लागत आहे.

Tags:    

Similar News