पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचं 'अभाविप'वरचं फेसबुक लाईव्ह ट्रोलिंगनंतर रद्द

Update: 2020-04-12 00:13 GMT

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या फेसबुक पेजवरचं नियोजित फेसबुक लाईव्ह रद्द करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर हे लाईव्ह रद्द करण्यात आलंय.

लॉकडाऊनमुळे सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता परीक्षा होणार का आणि कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यातच आता लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

अशात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कलमळकर हे 'अभाविप मालेगाव' या फेसबुक पेजवर परिक्षांबाबत विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधणार असल्याची पोस्ट या पेजवर टाकण्यात आली होती. त्यानंतर अनेक विद्यार्थी संघटनांनी यावर आक्षेप घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची यंत्रणा असतांना एखाद्या विद्यार्थी संघटनेच्या पेजवरून परिक्षांबाबत भूमिका का मांडली जात आहे असा सवाल या संघटनांनी केला. यावर सोशल मीडियावर चांगलंच वातावरण तापलं.

पुणे विद्यापीठातील 'स्टुडेंट हेल्पिंग हँड'चे कुलदीप आंबेकर यांनी याबाबत कुलगुरू करमळकर यांच्याकडे विचारणा केली असता, मी फेसबुकवर नाही आणि तसे कधी बोलतही नाही असं करमळकर यांनी स्पष्ट केलं. योग्यवेळी व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधेन असंही त्यांनी सांगितलं.

अभाविपच्या सूत्रांकडूनही हे लाईव्ह रद्द झाल्याची माहिती आहे. 'अभाविप मालेगाव'या पेजवरूनही लाईव्हसंदर्भातील पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.

Similar News