तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलीकडील आहे - अजित पवार
पुणे पोलीस टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहाराचा तपास योग्य पद्धतीने करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी केली जात असली तरी सध्या त्याची आवश्यकता नाही. गैरव्यवहार कुणाच्याही काळात झालेला असो, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे // पुणे पोलीस टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहाराचा तपास योग्य पद्धतीने करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी केली जात असली तरी सध्या त्याची आवश्यकता नाही. गैरव्यवहार कुणाच्याही काळात झालेला असो, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन समारंभानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, टीईटी पेपरफूट व गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलीकडील आहे. याबाबत खोलवर तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं पवार म्हणाले. सोबतच त्यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीवर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची आठवण करून देत म्हटले की, मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सीबीआयने केलेला तपास सुरुवातीला भरकटला होता. शेवटी सुशांतने आत्महत्याच केल्याचेच निष्पन्न झाले. हे विसरता येणार नाही, असं पवार म्हणाले.
त्याचबरोबर केंद्र शासनाने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केलेत. महाराष्ट्रातही गर्दी टाळण्याचे व कोरोनाविषयक सर्व नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे.