गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळासाठी 20 कोटींची तरतूद, 'ही' तर सुरुवात आहे: धनंजय मुंडे

Update: 2021-07-05 13:47 GMT

 'लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ' अस्तित्वाच आल्यानंतर पहिल्यांदाच राज्य शासनाने 20 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या पावसाळी अधिवेशनात आज पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी ही घोषणा करण्यात आली. खरं तर मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनातच हा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची घोषणा झाली होती.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वाटचालीची ही सुरुवात आहे; आणखी खूप कामे करणे बाकी आहे. राज्यसरकारने ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कधीही निधीची कमतरता भासणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. असं मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यादृष्टीने नुकतीच धनंजय मुंडे यांनी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनेंतर्गत १० जिल्ह्यातील ४१ तालुक्यात ८२ वसतीगृहे उभारण्यास व यापैकी २० वसतीगृहे याच शैक्षणिक वर्षात उभारण्यास राज्यशासनाने मान्यता प्रदान केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे आता जुलै २०२१ या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात पुरवणी मागण्यांच्या यादीत या महामंडळास भागभांडवल अंशदान म्हणून १० कोटी रुपये आणि सहाय्यक अनुदान म्हणून १० कोटी असे एकूण २० कोटी रुपये महामंडळ भागभांडवल म्हणून तरतूद करण्यात आली आहे.

ऊसतोड कामगारांसाठी अनेक नेते पुढे आले, अनेक वर्ष विविध घोषणा झाल्या. मात्र, त्यांच्या कल्याणासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलण्यात आली नाही. धनंजय मुंडे यांनी मात्र, सत्तेत आल्यानंतर दीड वर्षांच्या आत ऊसतोड कामगारांच्या बाबत ठोस निर्णय घेऊन महामंडळास मूर्त स्वरूप प्रदान केले आहे. आज या महामंडळास आर्थिक तरतूद प्राप्त झाल्याने या महामंडळाचे भविष्य आशावादी ठरणार आहे!

Tags:    

Similar News