चेंबूरमधील संत एकनाथ शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

Update: 2024-02-12 13:18 GMT

मुंबई: चेंबूर येथील संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले. हे आंदोलन वसतिगृहाच्या प्रांगणात झाले असून विद्यार्थ्यांनी आपल्या आक्रमक शैलीत घोषणाबाजी करत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांना या आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडले. यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील अनेक समस्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. आम्ही मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतो पण इथलं प्रशासन जाणीवपूर्वक आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी मांडली

वसतिगृहातील विद्यार्थी पुढील मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.

1 ) शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये आधुनिक गरजांनुसार सुधारणा करणे.

2) चेंबूर येथे स्वतंत्र संत एकनाथ वसतिगृह उभारणे.

3) मे. जॉयनेस्ट प्रीमायसेस प्रायव्हेट लि., मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. आणि क्रिस्टल गवर्णमेंट प्रायव्हेट लि. यांच्यावर अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांचे शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे आणि त्यांना काळ्या यादीत टाकून हद्दपार करणे.

4) झुनझुनवाला महाविद्यालयावर कायदेशीर कारवाई करणे.

5) सेंट्रलाइज्ड भोजन पुरवठा कंत्राट रद्द करून 6 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या लघु उद्योजकांना भोजन पुरवठा कंत्राट देणे.

6) निर्वाह भत्ता आणि स्टेशनरी वेळेवर मिळणे.

7) मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणे.

8) दापोली येथे 100 विद्यार्थी आणि 100 विद्यार्थिनी क्षमतेचे वसतिगृह चालू करणे.

9) विद्यार्थ्यांना इंटरमिडीएट वर्गासाठीही वसतिगृह प्रवेश देणे.

10) राज्यातील सर्व सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमधील सर्व जागा फक्त अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे.

11) इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करणे.

12) मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ वितरित करणे.

13) गृहपाल ते सचिवांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे.

14) चेंबूर येथील वसतिगृहाच्या परिसराचे नाव "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्या संकुल" असे करणे.

इत्यादी मागण्यांची विद्यार्थ्यांनी मागणी केली असून साफसफाईपासून ते जेवणापर्यंत सर्व बाबींमध्ये तक्रार केली आहे तरी सुध्दा प्रशासन त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे.

आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशनचे आनंदराज घाडगे यांनी सांगितले की, "जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही." विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते हे पाहणे गरजेचे आहे. दरम्यान रोहित कांबळे, संदीप कांबळे, बुद्धभूषण कांबळे सह इतर अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Full View

Tags:    

Similar News