राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देत आहेत. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी उत्तरेच्या राजकारणात जास्त लक्ष घालण्याचे ठरवलं आहे, त्यामुळे रायबरेली लोकसभा मतदारसंघ कायम ठेवत वायनाड मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वायनाड च्या मोकळ्या झालेल्या मतदारसंघातून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
आता तीन गांधी संसदेत पाहायला मिळतील
राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या जागांवरून निवडणूक जिंकले होते. मात्र एका खासदाराला एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करता येत असल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे, त्यानुसार राहुल गांधी यांनी केरळ मधील वायनाड मतदार संघाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढले होते. त्यातील अमेठी मध्ये त्यांना भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. या अडचणीच्या वेळी वायनाडने त्यांना साथ दिली. यंदा राहुल गांधी यांनी गांधी परिवाराच्या पारंपारिक रायबरेली जागेवरून निवडणूक लढवली होती. सोनिया गांधी यांनी राज्यसभेची उमेदवारी घेऊन राहुल गांधीसाठी रायबरेली मोकळी करून दिली होती. २०२४ लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड दोन्ही जागांवर जिंकले.
आता राहुल गांधी यांनी वायनाड ची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवर प्रियांका गांधी निवडणूक लढतील असं पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं आहे. प्रियांका गांधी वायनाड ला न्याय देतील, मी सुद्धा वायनाड ला येत राहणार आहे असं सांगत राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी उत्तर प्रदेश मध्येही सक्रीय राहतील असं म्हटलं आहे. प्रियांका गांधी जर वायनाड मधून जिंकल्या तर लोकसभेत राहुल-प्रियांका जोडी आणि राज्यसभेत सोनिया गांधी असे तीन गांधी संसदेत पाहायला मिळतील.