पोलिसांच्या कोठडीत दलित युवकाचा मृत्यू, पीडित कुटुंबाच्या भेटीला जाणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Update: 2021-10-20 13:31 GMT

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखलं आणि नंतर प्रियांका गांधींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, आग्रा एक्स्प्रेसवेच्या एंट्री पॉईंटवर काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी चांगलीच झटापट झाली. या अगोदरही प्रियांका गांधी यांना लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर गाडी चालवण्यात आल्याच्या घटनेनंतर ताब्यात घेण्यात आले होते.

प्रियंका गांधी या आग्रा येथे अरुण वाल्मीकी यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होत्या. अरुण वाल्मिकीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या प्रकरणी ट्विट केलं आहे.

अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय  "आग्रा येथील पोलिसांच्या मालखान्यातून 25 लाखांची चोरी झाली आणि नंतर सत्य लपवण्यासाठी अटक करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्याची कोठडीत हत्या करण्यात आली." असा आरोप करत अखिलेश यांनी या घटनेत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मायावतींनीही केलं ट्विट...

माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही या प्रकरणी ट्विट केलं आहे. आग्रा येथे पोलीस कोठडीत सफाई कामगाराचा मृत्यू अत्यंत दु: खद आणि लज्जास्पद असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने दोषींना कडक शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबालाही मदत द्यावी, अशी मागणी देखील बसपाने केली आहे.

दरम्यान, स्थानिक वर्तमानपत्रांच्या माहितीनुसार, आग्रा येथील जगदीशपुरा पोलिस स्टेशनच्या मालखानामधून शनिवारी रात्री 25 लाख रुपये चोरीला गेले. या प्रकरणात पोलिसांनी सफाई कामगार अरुण वाल्मिकीला ताब्यात घेतलं होतं. पण पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार अरुणची तब्येत बिघडली आणि त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.

वाल्मिकी समाज संतप्त...

दरम्यान, या घटनेमुळे वाल्मिकी समाजातील लोकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहेवाल्मिकी समाजाच्या लोकांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Tags:    

Similar News