पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील जनतेला संबोधित करणार

Update: 2021-10-22 03:34 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील नागरिकांना संबोधित करणार आहे. सकाळी 10 वाजता पंतप्रधान जनतेशी संवाद साधतील. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. देशभरात शंभर कोटी लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोदी जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

देशात सुमारे गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी घट झाली आहे. तर लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. अशावेळी देशाने नवा इतिहास रचून जगभरात आपला डंका वाजवला आहे. भारत सरकारच्या कोव्हिन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 100 कोटी डोस देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे देशात 75% प्रौढांना लसीची किमान पहिली मात्रा देण्यात आली आहे. 100 कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरात 100 स्मारके तिरंग्याने प्रकाशित करण्यात आली होती. 21 ऑक्टोबरचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. आतापर्यंत चीननंतर 100 कोटींपेक्षा जास्त कोरोना लसीचे डोस देणारा भारत हा दुसराच देश ठरला आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी याआधीच सांगितले होते की, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस वेळेत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देशातील 75 टक्के प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लोकसंख्येच्या 31 टक्के नागरिकांनी दुसरा डोसदेखील घेतला आहे.

Tags:    

Similar News