राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची तारीख ठरली !

राज्यसभा निवडणूकीपाठोपाठ देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचे वेध लागले होते. मात्र निवडणूक आयोगाने आता राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.;

Update: 2022-06-16 04:31 GMT

राज्यसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांना राष्ट्रपती निवडणूकीचे वेध लागले आहेत. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

देशाचे 15 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यापुर्वी 16 व्या राष्ट्रपतींची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम. १९५२ च्या कलम ४(१) राष्ट्रपती निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 29 जून असून 30 जून रोजी अर्जांची छाणणी करण्यात येणार आहे. त्यानंतर २ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. मात्र आवश्यकता पडल्यास 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणूकीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारच्या 15 जून 2022 च्या राजपत्रात पुन्हा प्रसिध्द करण्यात आली आहे.

राष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसंदर्भात ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांना पत्र पाठवले होते. तर ही बैठक काल दिल्लीत पार पडली. यामध्ये विरोधी पक्षांकडून शरद पवार यांना राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी गळ घालण्यात आली होती. मात्र शरद पवार यांनी ट्वीट करून आपण राष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार नाहीत, असे स्पष्ट केले. त्यानंतर विरोधी पक्षाकडून दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे बिहारचे  लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रपती पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Tags:    

Similar News