मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवं वेळापत्रक जाहीर होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही परीक्षा झाली नव्हती. त्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा मागील वर्षी संपत आहे मात्र, अशा विद्यार्थ्यांना आणखीन एक वर्ष ही परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परिक्षा नव्याने राबवावी लागणार आहे. त्यामुळे दोन जानेवारीला होणारी ही परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलाय. परीक्षेचं नवं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं आयोगने म्हटलं आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/tjqHxgbdkw
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 28, 2021
पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी , तहसीलदार अशा 390 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. राज्यात ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादेची अट ओलांडली आहे अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात 17 डिसेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यामध्ये 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना दिलासा देण्यात आला आहे. ते विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. त्यासाठी अशा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सुद्धा मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांनी 28 डिसेंबर 2021 ते 1 जानेवारी 2022 रात्री 12 पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन शुल्कासह भरायचे आहेत.