'पोटरा' चित्रपटाची 'कान्स' महोत्सवासाठी निवड

Update: 2022-05-08 09:22 GMT

शिरापूर (ता. मोहोळ) : येथील युवा दिग्दर्शक शंकर धोत्रे यांच्या पोटरा चित्रपटाचे फ्रान्स येथील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शन होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मुंबई याबाबतची घोषणा केली.

पोटरा चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात झाले आहे. या चित्रपटातून एका गरीब घरातील मुलीची व्यथा मांडण्यात आली आहे. सिनेमाची मुख्य अभिनेत्री छकुली देवकर ही मूळची आष्टी गावची आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या मरिआई वाले समाजातील एका मुलीला घेऊन शंकर धोत्रे यांनी हा सिनेमा साकारला आहे.


'पोटरा', 'कारखानीसांची वारी' आणि 'तिचं शहर होणं' या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे कान्स (फ्रान्स) येथे 17 मे ते 28 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्व वाढविणे या हेतुने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी सहभागी होतात.


या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवावयाच्या ३ मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत श्री. अशोक राणे, श्री. सतिश जकातदार, श्रीमती किशोरी शहाणे-विज, श्री. धीरज मेश्राम, श्री मनोज कदम, श्री. महेंद्र तेरेदेसाई व श्री. दिलीप ठाकुर या ७ तज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 32 चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित "पोटरा", नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित "कारखानीसांची वारी" आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित "तिचं शहर होणं" या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.

'पोटरा' म्हणजे काय?

'पोटरा' चा अर्थ 'कच्ची ज्वारी' असा होतो. आपल्या कथेद्वारे लेखक/ दिग्दर्शकाने एक साधर्म्य रेखाटले आहे. चित्रपटात वापरलेली लोकगीते मुलीच्या गर्भापासून ते किशोरावस्थेपर्यंतचा प्रवास अधोरेखित करते.


'पोटरा' या चित्रपटात गीता ही मुख्य भूमिका छकुली प्रल्हाद देवकर हिने साकारली आहे. छकुली देवकर आष्टी येथील रहिवासी आहे. तिचा हा पहिला चित्रपट असून २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात गीताच्या वडिलांची भूमिका सुहास मुंडे तर गीताच्या आजीची भूमिका नंदा काटे यांनी साकारली आहे.

मंगळवेढा भागात झाले चित्रीकरण

पोटरा चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात झाले आहे. या चित्रपटातून एका गरीब घरातील मुलीची व्यथा मांडण्यात आली आहे. सिनेमाची मुख्य अभिनेत्री छकुली देवकर ही मूळची आष्टी गावची आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या मरिआई वाले समाजातील एका मुलीला घेऊन शंकर धोत्रे यांनी हा सिनेमा साकारला आहे. या चित्रपटाचे निर्माते शरद शिंगाडे आहेत. या चित्रपटाने पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोटराचे प्रदर्शन झाले आहे.

Tags:    

Similar News