अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला

Update: 2021-09-23 06:18 GMT

अलाहाबाद : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमुळे देशभर खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह अलाहाबादेतील बाघंबरी मठात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. दरम्यान नरेंद्र गिरी यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवत अनेक गंभीर आरोप केले होते. आपल्या आत्महत्येसाठी त्यांनी अनेकांना जबाबदार धरलं होतं. दरम्यान महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या नसून हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत त्यांचे शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेतले. अटकेनंतर न्यायालयात हजर केलं असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सोबतच या प्रकरणी बडे हनुमान मंदिराचा पुजारी आद्य प्रकाश तिवारीला अटक केली आहे. दरम्यान महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस संबंधित सर्व पैलूंचा तपास करत असून दोषींची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं.

दरम्यान पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट नुसार महंत नरेंद्र गिरी यांचा फास घेतल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. नरेंद्र गिरी यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचं स्पष्ट होत आहे. "पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये नरेंद्र गिरी यांच्या गळ्याभोवती फास घेतल्यानंतर येणारा व्ही मार्क दिसत आहे," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, डॉक्टरांना व्हिसेरा जपून ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरुन इतर कोणत्या शक्यतांबाबतही स्पष्टता येईल.

Tags:    

Similar News