लॉक डाऊनचे 'आफ्टर शॉक्स'

सामना संपादकीय मधून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका सुरू असून आज 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची ‘मलमपट्टी’ करूनही पुणे-कोलकात्यातील तरुण काय किंवा दरोडेखोर बनलेला सुरतमधील हिरे व्यावसायिक.महामारीचे सावट हळूहळू कमी होईलही, पण लॉकडाऊनचे ‘आफ्टर शॉक्स’ कधी थांबणार, या प्रश्नाचे काय उत्तर केंद्रातील सरकारजवळ आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.;

Update: 2021-01-15 07:54 GMT

Courtesy -Social media

देशभरात 'अनलॉक'मुळे बाजार व्यवहार बऱ्यापैकी पूर्वपदावर येत असले तरी 'लॉक डाऊन'चे 'आफ्टर शॉक' थांबायला तयार नाहीत. लॉक डाऊनच्या तडाख्याच्या दुर्दैवी कहाण्या बाहेर येतच आहेत. या तडाख्याने अनेकांचे होत्याचे नव्हते झाले, व्यावसायिकांचे धंदे बुडाले, नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या. लॉक डाऊनमुळे आलेल्या आर्थिक आणि मानसिक तणावातून अनेकांनी आत्महत्या केल्या. आता याच तणावाने एका व्यापाऱ्याला चक्क दरोडेखोर बनविल्याचे समोर आले आहे. लॉक डाऊनचा हा धक्कादायक परिणाम सुरतमध्ये दिसला आहे. सुरतमधील एक हिरे व्यावसायिक उदयवीर तोमर ऊर्फ पप्पू हा लॉक डाऊनच्या तडाख्याने थेट दरोडेखोरच बनला. लुटारूंची एक टोळीच त्याने बनवली. नऊ महिन्यांपूर्वी हिऱयांना पॉलिश करणारा पप्पू 'हिरे चोर' बनला. जे हिरे व्यापारी लॉक डाऊनपूर्वी उदयवीर याला हिरे पॉलिश करायला द्यायचे त्यांचेच हिरे लुटण्याचे गुन्हे तो करू लागला. हिरे पोहोचवणाऱ्या अंगडियांना साथीदारांच्या मदतीने मध्येच लुटायचे आणि त्यांच्याकडील हिरे पळवायचे ही उदयवीर याची पद्धत होती. आता हे महाशय गजाआड आहेत. लॉक डाऊनने समाजात किती भयंकर उलथापालथी घडविल्या आहेत याचेच हे उदाहरण असल्याचे सामनातून मांडण्यात आले आहे.

व्यापार, उद्योग, छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले. आधीच नोटाबंदी आणि जीएसटीच्या तडाख्याने घसरलेले छोटय़ा, मध्यम व्यावसायिकांचे गाडे लॉक डाऊनने पार कोलमडले. उदयवीर तोमरचेही तेच झाले आणि हिरे पॉलिशच्या यंत्राऐवजी त्याने हातात थेट बंदूकच घेतली. तो पोलिसांच्या तावडीत सापडला म्हणून लॉक डाऊनचा हा आणखी एक भेसूर चेहरा समोर आला. लॉक डाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. ज्यांच्या नोकऱ्या शाबूत आहेत त्यांच्या पगारावर संक्रांत आली. त्यामुळे शाळेच्या फीपासून कर्जाच्या हप्त्यांपर्यंत अडचणींचा डोंगरच कोट्यवधी नोकरदारांसमोर उभा राहिला. त्यातून काहींनी स्वतःचे जीवन संपविले. काहींनी कुटुंबासह आत्महत्या केल्या, काहींवर भीक मागायची वेळ आली तर अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडले. उत्तराखंडमध्ये पगारकपातीमुळे वडील शाळेची फी भरू शकले नाहीत म्हणून मुलाने कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सुमारे पाच लाख रुपये लुटल्याची घटना अलीकडेच समोर आली होती. लॉक डाऊनमध्ये नोकरी गेलेल्या पुण्यातील एका तरुणाने दुचाकी चोरण्याचे प्रकार केले. कोलकात्यामधील रतन भट्टाचार्य हा सुरक्षा रक्षक चोर बनला तोदेखील लॉक डाऊनमध्ये नोकरी गेल्यानेच. भुरट्या चोऱ्या करून उदरनिर्वाह करण्याची वेळ त्याच्यावर आली.

लॉक डाऊन हा कोरोनाचा एक अपरिहार्य परिणाम असला तरी त्याचे किती भयंकर सामाजिक परिणाम झाले आहेत हेच या सर्व उदाहरणांवरून दिसून येते. कोरोनाने अर्थव्यवस्थेला तर तडाखा दिलाच, शिवाय कोट्यवधी कामगारांनाही देशोधडीला लावले. लाखो व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आणि त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली. हिंदुस्थानसारख्या देशात तर सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रातील कामगारांना बसला. या क्षेत्रातील सुमारे 40 कोटी लोक गरिबीच्या गर्तेत सापडले. कोरोनामुळे घसरलेले आर्थिक गाडे सावरण्यासाठी केंद्र सरकारने 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची 'मलमपट्टी' केली खरी, पण 'अनलॉक' होऊन दोन-तीन महिने उलटूनही ना देशाचे गाडे रुळावर आले आहे ना सर्वसामान्यांचे. चोर बनावे लागलेले पुणे-कोलकात्यातील तरुण काय किंवा दरोडेखोर बनलेला सुरतमधील हिरे व्यावसायिक काय, हे सगळेच लॉक डाऊनचे 'आफ्टर शॉक्स' आहेत. पुन्हा हे समोर आलेले धक्के आहेत. 'नोंद' होऊ न शकलेले आणखी किती 'धक्के' असतील आणि त्या धक्क्यांनी किती कुटुंबे उद्ध्वस्त केली असतील याची कल्पनाच न केलेली बरी! कोरोनाचे लसीकरण आता सुरू होईल. त्यामुळे या महामारीचे सावट हळूहळू कमी होईलही, पण लॉक डाऊनचे 'आफ्टर शॉक्स' कधी थांबणार, या प्रश्नाचे काय उत्तर केंद्रातील सरकारजवळ आहे? सामना संपादकीय मधून उपस्थित करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News