राजकारण माझा मार्ग नाही, मी गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठी करणार

Update: 2024-03-24 09:49 GMT

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज अंबड तालूक्यातील आंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा समाजबांधवांना संबोधित करताना जरांगे पाटलांनी निवडणूकीविषयी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येकाने हा इथला कार्यक्रम झाल्यानंतर आपापल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घ्यावी. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत समाजातील लोकांचा काय विचार आहेत याबाबत लोकांचं मत काय, ते मला पुढील चार दिवसात ३० मार्चपर्यंत कळवा त्याचबरोबर सगळ्या मराठा नेत्यांची भूमिका काय आहे किंवा ते याबद्दल काय बोलतात होकारार्थी आणि नकारार्थी अशा सगळ्यांची टक्केवारीसह लेखी नोंद मला येत्या चार दिवसात आणून द्या. त्यानंतर आपण यावर अंतिम निर्णय घेऊ, अशा पध्दतीची भूमिका मनोज जरांगे यांनी या बैठकीच्या निमित्ताने मांडली.

या बैठकीत जमलेल्या मराठा समाजाला संबाधित करताना मनोज जरांगे यांनी आपलं वैयक्तिक मतही नोंदवलं आहे. ते म्हणाले की, राजकारण हा माझा मार्ग नाही, आणि इथून पुढे ही मी राजकारणात जाणार नाही या मतावर मी ठाम असून मला सामान्य गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी करायची आहेत. मला ते निवडणूकीच्या फॉर्मबद्दल काही माहित नसल्यामुळे ते तुम्ही तुमच्या पातळीवर बघून घ्या. मी शेवटपर्यंत फक्त समाजकारण करणार आहे. मराठ्यांच्या पोरांसाठी मागच्या ७ महिन्यांपासून मी एक इंच देखील मागे हटलो नाही, असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान पाटील म्हणाले की, आपण आता लोकसभेच्या नादी न लागता विधानसभा निवडणूकीत राज्यकर्त्यांना आपला हिसका दाखवून देऊ.

राज्यात मागील ७ महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा केली असली तरी सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत काढलेल्या अधिसुचनेची अंमलबजावणी करावी, असी मागणी जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली असुनसुध्दा सरकारने याबाबत अद्याप निर्णय घेतला नसून लोकसभा निवडणूकीसाठी आचारसंहितेची घोषणा झाली. त्यामूळे आपल्याला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. असं सांगत मनोज जरांगे यांनी या बैठकित निवडणूकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 

Tags:    

Similar News