पोलंडच्या मारीया आंद्रेझिकने ऑलिंपिक पदक लिलावात विकलं, टोक्यो ऑलिंपिकमध्ये जिंकले होते रौप्य पदक
पोलंडची मारीया आंद्रेझिक हिने टोक्यो ऑलिंपिकमध्ये जिंकलेल्या रौप्य पदकाचा लिलाव केला आहे. ८ महिन्यांच्या मिलोझेक मलीसा या लहान बाळाच्या उपचारांसाठी तिने पदक विकून निधी उभारला आहे.;
पोलंडची महिला भालाफेकपटू मारीया आंद्रेझिक (Maria Andrejczyk) हिने टोक्यो ऑलिंपिकमध्ये जिंकलेल्या रौप्य पदकाचा लिलाव केला आहे. तिच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आपण म्हणाल ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. त्यात जिंकलेलं पदक इतक्या सहजासहजी विकणं म्हणजे... असो... तिनं असं का केलं हे जाणुन घेतल्यावर आपणही तिला सलाम केल्याशिवाय राहणार नाही.
८ महिन्यांच्या मिलोझेक मलीसाच्या उपचारांसाठी उभारला निधी
मायदेशी परतल्यानंतर मारीयाला एका ८ महिन्यांच्या मिलोझेक मलीसा या लहान बाळाची कथा समजली. मिलोझेकवर अमेरीकेतल्या स्टँनफर्ड युनिव्हर्सिटीत हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. ज्यासाठी २.८६ कोटी इतका खर्च येणार आहे. ही बातमी मारीया पर्यंत पोहोचली आणि तिने दुसरा कोणताही विचार न करता आपलं रौप्य पदक लिलावात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मदत निधी गोळा केला. मारियानं याबाबत तिच्या फेसबूक पोस्टमध्ये इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केलं. तिच्या या आवाहनाला प्रतिसादही मिळाला. पोलंडमधील सुपरमार्केट चेन चालवणाऱ्या जाबका या कंपनीनं तिचं पदक ९२.९० लाखांत खरेदी केले. तिनं फेसबूकवर केलेल्या आवाहनांतर १.४३ कोटी रुपयेही जमवण्यात आले. पण, ज्या कंपनीनं सर्वाधिक बोली लावली त्यांनी मारियाला तिचे पदक परत केलेच शिवाय लिलावात बोली लावलेली रक्कमही त्या मुलाच्या उपचारासाठी दिली.
मारीयाला स्वतःला देखील झाला होता कॅन्सर
सुरूवातीलाच आपल्याला दोन वर्षे मागे म्हणजे २०१८ मध्ये जावं लागेल. २०१६ रीओ ऑलिंपिकमध्ये मारीयाला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर ती सतत दुखापतींनी त्रस्त राहिली. या सगळ्याचा कहर म्हणजे ऑक्टोबर २०१८ मध्ये मारीयाला ओस्टीओसारकोमा नावाचा हाडांचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. यानंतर तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा एकदा मैदान गाजवायला सज्ज झाली. "हा कॅन्सरचा जास्त गंभीर प्रकार नव्हता आणि मला केमिओथेरपी देखील घ्यावी लागली नाही. त्यामुळे मला माहित होतं की मी यातुन लवकर बरी होईन", असे तिने विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०१९ मध्ये सहभागी होताना म्हटले होते. यानंतर आणखी कठोर मेहनत घेत तिने नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिंपिकमध्ये ६४.६१ मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक जिंकलं.