पुण्यात पोलीसांची ड्रग्स तस्करांवर धाड; तब्बल ११०० कोटींचं एमडी ड्रग्स जप्त
पुणे : पुणे पोलिसांकडून कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील एका औषधनिर्मिती कंपनीतून तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० कीलो पेक्षा अधिक एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. याआधी मिठाच्या पुड्यातून एमडी विक्री करणाऱ्या डिलरला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी गेल्या दोन दिवसात दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. यामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात अधिक माहिती आज पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक वसाहती जवळ असणाऱ्या, औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या आड एमडी ड्रग्स बनवण्याचे काम सुरू होते. ह्या संदर्भात पुणे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी संबधीत स्थळी धाड टाकत कारवाई केली. पुणे पोलिस आता ड्रग्स तस्करी विरोधात ॲक्शन मोडवर आले आहेत. ड्रग्स तस्कर ललित पाटील ह्याच्या करवाई नंतर पुण्यातली ही मोठी कारवाई आहे. या प्रकरणी अनिल साभळे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी येथून सोमवारी १०० कोटी पेक्षा अधिक एमडी ड्रग्स ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या मध्ये वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. पुणे) व हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) असे अटक कऱण्यात आलेल्या, ड्रग्स विक्री करणाऱ्या आरोपींची नावं आहेत. संबंधित आरोपी मीठाच्या पुढ्यात ड्रग्स भरून विक्री करत होते. या आरोपींची कसून चोकशी केल्यानंतर दौंड येथील फॅक्टरीची माहिती पोलिसांना मिळाली. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
दौंड येथे संबंधित कारखान्यावर आज सकाळी पुणे पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार , पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली. या वेळी ६०० किलो एमडी ड्रग्स ताब्यात घेण्यात आले आणि कारखाना चालवणाऱ्या अनिल साबळे याला अटक केली असून या बाबत पुढील तपास पोलीस करत आहे.