भाजप आमदाराविरोधात बातमी दिल्याने पत्रकाराचे काढले कपडे

मध्य प्रदेशमध्ये एक युट्यूब पत्रकार आणि सात लोकांचा पोलिस ठाण्यातील एकत्रित अर्धनग्न अवस्थेतील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तर या फोटोतील लोकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचे कपडे काढल्याचा दावा केला जात आहे. त्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Update: 2022-04-07 14:33 GMT

नीरज कुंदर (Neeraj Kundar) नावाच्या थिएटर कलाकाराने (Theatre Artist) भाजप आमदार केदारनाथ शुक्ला (BJP MLA kedarnath Shukla) आणि त्यांचा मुलगा गुरू दत्त विरोधात अवमानजनक टिपण्णी केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार एका नकली अकाऊंटच्या माध्यमातून टिपण्णी केली होती. तर हा प्रकार 2 एप्रिल रोजी घडला असून गुरूवारी फोटो व्हायरल झाल्यामुळे हा संतापजनक प्रकार चर्चेत आला.

या प्रकारावर कोतवाली पोलिस स्टेशनचे इनचार्ज मुकेश सोनी (police station incharge Mukesh soni) यांनी सांगितले की, नीरज कुंदर यांनी नकली फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून अनेकदा अवमानजनक टिपण्णी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र नीरज कुंदर या थिएटर कलाकाराला अटक केल्यानंतर कनिष्क तिवारी नावाच्या युट्यूब पत्रकारासह काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी कलाकाराच्या अटकेविरोधात पोलिस ठाण्यात घोषणाबाजी केली. तसेच पोलिस आणि राज्य सरकारवर टीका केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र पोलिसांनी युट्यूब पत्रकारासह आठ जणांचे कपडे काढून त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर या सर्वांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Journalist Semi naked photo viral)

पत्रकार रणविजय सिंह (Journalist Ranvijay singh) यांनी या प्रकरणावर ट्वीट दावा केला आहे की, हे मध्यप्रदेशातील यु-ट्यूब पत्रकार आहेत. त्यांनी भाजप आमदाराच्या विरोधात बातमी चालवली. त्याबद्दल पोलिसांनी त्यांचे कपडे काढून नग्नावस्थेत उभे केले. तर त्यानंतर रणविजय सिंह यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटले आहे की, या पत्रकारांचा गुन्हा मोठा आहे. सर्वात मोठा गुन्हा आहे. कारण त्यांनी पत्रकार असतानाही बातमी चालवली. हे महापाप आहे. परंतू तरीही त्यांना थोडासा दिलासा देण्याची मागणी करून मुर्खपणा करत आहे. त्यांच्यावर कृपा करावी. त्यांच्या घरावर बुलडोजर चालवून यांना सोडून देण्यात यावं, ही मोठी कृपा होईल, असे रणविजय सिंह यांनी म्हटले आहे.

तसेच भदोही वल्लभ यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, नव्या भारताचा हा बुलंद फोटो आहे. या फोटोत दिसणारे अर्धनग्न लोक हे मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील पत्रकार आहेत. दाढीसह बाजुला उभे असलेले पत्रकार कनिष्क तिवारी आहेत. ते युट्यूब चॅनल चालवतात आणि फ्रीलान्सींग करतात. त्यांचा गुन्हा हा आहे की, त्यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार केदारनाथ शुक्ला यांच्याविरोधात बातमी चालवली. यापुढे जाऊन पत्रकार भदोही वल्लभ यांनी म्हटले आहे की, त्यांचे फक्त कपडे उतरवले नाहीत. तर त्यांची धींड काढली. याबरोबरच भदोही वल्लभ यांनी दावा केला आहे की, कनिष्क तिवारी यांनी विरोधात बातमी चालवली. त्यामुळे आमदार शुक्ला यांनी पोलिस ठाण्यातून कनिष्क तिवारी यांना पकडून आणण्यासाठी पोलिस पाठवले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केले. तर 18 तास सर्वांना अर्धनग्न अवस्थेत पोलिस ठाण्यात उभे केले, असा दावा पत्रकार भदोही वल्लभ यांनी केला आहे.

मात्र या प्रकारावर मुकेश सोनी या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सामान्य तपासणीसाठी या सर्वांचे कपडे काढले होते. त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आली नाही. याबरोबरच आम्हाला माहिती मिळाली होती की, युट्यूब पत्रकार ब्लॅकमेल करत होता. त्याबाबत अनेकवेळा त्या पत्रकाराला विचारणा केली. मात्र त्याने पोलिस ठाण्यात धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

Tags:    

Similar News