Video: लसीकरण केंद्रावर तरुणांची पोलीसांसोबत हुज्जत, पोलिसांनी केली धुलाई
बीड शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र, आज सकाळी बारा वाजता या ठिकाणी गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शिस्तीत रांगेत बसून राहा असं सांगितलं,
मात्र, यावेळी काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यात बीडचे पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांना काही तरुणांनी मारहाण केली. या मारहाणीत संतोष वाळके यांच्या मानेजवळ दुखापत झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज देखील केला.
या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तरुणांची चांगलीच धुलाई केली. मात्र, लसीकरण केंद्रावर झालेल्या गोंधळामुळे वयोवृद्ध आणि लस घेण्यासाठी आलेल्या महिलांची तारांबळ उडाली.
एकीकडे लसीकरण सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न होत असताना, दुसरीकडे लसीकरण केंद्रावरील गोंधळ आणि मारहाण झाल्याने, संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात गोंधळ घालणाऱ्या सहा जणांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लसीकरण केंद्रावर घडलेला प्रकार संदर्भात बीडचे पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांनी माध्यमांना माहिती दिली.
बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना ती कमी करण्यासाठी लसीकरण देखील सुरू आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत अडीच लाख नागरिकांना लसीकरण देण्यात आले आहे. मात्र, 45 वर्षाच्या पुढील लोकांचे अद्याप देखील लसीकरण करणे बाकी असताना, 18 वर्षापासून लसीकरण सुरू केल्यामुळे, लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यातच तरुण अग्रेसिव्ह होत असताना देखील पाहायला मिळत आहेत. यातच बीड जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज सकाळपासून गर्दी झाली होती. त्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी सूचना दिल्या. मात्र सूचना देऊन ऐकत नसल्यामुळे, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
या झटापटीत काही तरुणांनी बीडचे पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांना धक्काबुक्की केली. यातच काही कर्मचाऱ्यांना देखील मारहाण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर बीडच्या पोलीस दलाने गोंधळ घालणाऱ्या तरुणावर लाठीचार्ज केला, धरपकड करून सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
या घडलेल्या प्रकारामुळे लसीकरण केंद्रावर आलेल्या वयोवृद्ध आणि महिला यांच्यामध्ये भीतीचे वातावरण होते. काही काळ जिल्हा रुग्णालय तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यात पळून जाणाऱ्या तरुणाचा पाठलाग करत असताना पोलिस कर्मचारी देखील काठी घेऊन त्यांच्या पाठीमागे धावताना चे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.