"तुम्ही मोबाईलची चोरी केली आहे, भरुन द्या अन्यथा तुमची नोकरी जाईल'' इतकच नाही तर पोलिसांनी पट्ट्याने मारहाण केली असल्याचा धक्कादायक आरोप आशा कर्मचारी रेणुका तलवारे यांनी केला आहे. यावेळी पोलीस स्थानकात वरिष्ठ अधिकारी देखील होते. या अधिकाऱ्यांनी देखील मला आई-बहिनी वरून शिवीगाळ केली असल्याचं या महिलेने सांगितले आहे..
मोबाईल चोरीच्या तपासासाठी पोलीसांनी आशा कर्मचारी रेणुका तलवारे यांना केलेल्या बेकायदेशीर मारहाणीच्या निषेधार्थ आयटक संलग्नीत महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी पोलीस स्टेशनवर मूकमोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना विचारणा केली आहे. नाशिक जिल्यातील इंद्रायवाडी येथील आशा कर्मचारी रेणुका रघुनाथ तलवारे यांना चांदवड येथील द्वारकाधिश हॉस्पीटलमध्ये मोबाईल चोरल्याच्या आरोपातून 10 जानेवारी रोजी महिला पोलिस कर्मचारी आहिरे यांनी फोन करुन बोलावले होते. तिथे आल्यावर "तुम्ही मोबाईलची चोरी केली आहे, भरुन द्या अन्यथा तुमची नोकरी जाईल'' असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर त्यांना रात्री साडेनऊ पर्यंत पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप तलवारे यांनी केला आहे.
हा सगळा प्रकार नातेवाइकांना समजल्या नंतर दुसऱ्या दिवशी नातलगांनी पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच फुटेजमध्ये त्या दिवसभरात त्या तिथे दिसूनच आल्या नाहीत. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी पंचायत समिती कार्यालयापासून पेट्रोलपंप चौफुली मार्गे चांदवड पोलीस स्टेशनवर मुकमोर्चा काढला. या घटनेची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. या सगळ्या भयंकर प्रकारानंतर देखील पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याने आशा स्वयंसेविकांनी पोलीस स्थानकात सुमारे तीन तास ठिय्या दिला होते.
आयटकचे सरचिटणीस राजू देसले, उसवाड येथील आरोग्य उपकेंद्राचे एमओ रसाळ, ऍड. दत्तात्रय गांगुर्डे, कॉ. सुकदेव केदारे, आशा संघटनेच्या जिल्हा सचिव सुवर्णा मेतकर आदींसह आशा स्वयंसेविकांनी मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना आशा सेविका तलवारे यांना झालेल्या मारहाण, शिवीगाळबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी आशा कर्मचाऱ्यांना चौकशीचे आश्वासन दिले. यावेळी 26 जानेवारीपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास राज्यातील आशा, गटप्रवर्तक संघटना तालुका, जिल्हा पातळीवर तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे.