पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भडवली गावात 28 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काकडा आरती समाप्तीच्या काल्याच्या महाप्रसादातून या 28 जणांना विषबाधा झाल्याचे समजते. विषबाधा झालेल्यांमध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे. काकडा आरतीच्या समाप्तीला भडवली गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान महाप्रसाद घेतल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी काहींना उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास सुरू झाला. अचानक गावातील बऱ्याच लोकांना हा त्रास सुरू झाल्याने सर्वत्र भीतीच वातावरण पसरले, दरम्यान बाधित रुग्णांना जवळच्याच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट दिली. याबाबत पोलिसांनी अधिकची चौकशी सुरू केली आहे.