हमीभाम कामय राहणार असून, नवीन कृषी कायद्यांना एकदा संधी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेमध्ये सरकारची भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच नवीन कृषी कायदे केले आहेत त्यामुळे सरकारला एकदा कायद्यांची अंमलबजावणी करण्याची संधी देऊन आंदोलन मागे घ्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही परदेशी सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या ट्विटच्या पार्श्वभूमीवर FDI म्हणजेच Foreign Destructive Ideology पासून सावध राहण्याचे आवाहन केले. आपल्या देशात परकीय गुंतवणूक आणायची आहे पण अशा विचारसरणींपासून देशाला सुरक्षित राखायचे आहे असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. आज जे विरोधक कृषी कायद्यांना विरोध करत आहेत त्यांनीच गेली अनेक दशके कृषी सुधारणा होऊ दिल्या नाही असा आरोपही त्यांनी केला.
कोरोना संकटाशी देशाने जो यशस्वी लढा दिला त्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना देशवासियांना दिले. पण राज्यसभेत पंतप्रधानांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला.