'सबका साथ..ते सबका प्रयास' स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांची नवी घोषणा....
सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या आपल्या घोषणेत आणखी एका वाक्याची भर घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी 'सबका प्रयास' आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. "प्रत्येक देशाच्या वाटचालीत एक काळ असा येतो जेव्हा त्या देशाला नव्याने सुरूवात करण्याची आवश्यकता भासते. त्यामुळेच आता सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मुल्यांबरोबरच सबका प्रयास या मुल्याची भर घालावी लागेल, असे मोदींनी जाहीर केले. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देशाच्या शतक महोत्सवी स्वातंत्र्य दिनापर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार मोदींनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मोदींनी गेल्या 7 वर्षातील उज्ज्वला योजना, गरिबांना रेशनिंवर धान्य यासारख्या योजनांचा पुरुच्चार केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशात 75 नवीन अमृत महोत्सवी रेल्वे गाड्यांची घोषणा मोदींनी यावेळी केली. एक ध्येय ठेवून पुढील प्रयत्न करावे लागणार आहेत, त्यासाठी शंभर टक्के खेड्यांमध्ये रस्ते, शंभऱ टक्के कुटुंबांची बँकेत खाती, 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत आयुष्मान भारत कार्ड, पात्र लाभार्थ्यांपर्यंत उज्जवला योजना गॅस कनेक्शन असले पाहिजेत असे मोदींनी यावेळी सांगितले.
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कल्याणावर भर
देशात दोन एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या कल्याणावर सरकारचा भर असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.