पीआय करे यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे
पीआय करे यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या ऑडीओ क्लिपमध्ये पोलीस निरीक्षक करे एका वाळू तस्करासोबत संभाषण करत असल्याचे बोललं जातं आहे.
गेल्या आठवड्यात नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांची ऑडिओ क्लिप विविध समाज माध्यमाद्वारे व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तात्काळ त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने श्रीरामपुर डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे याबाबत पुढील चौकशी देण्यात आली आहे.
पोलिस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून घेता येईल तेवढे घेऊन जा. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सर्व बंद अशा आशयाची एका पोलीस अधिकारी व एक वाळूतस्कर यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप गुरुवारी नेवासा तालुक्यात व्हायरल झाली होती
त्या क्लिप मध्ये पीआय करे समोरच्या व्यक्तीला ' तुम्ही पिंपळगाव मध्ये उच्छाद मांडला असल्याने सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा मी पोलीस स्टेशनमधून पिंपळगाव येथे येण्यास निघालो आहे. मी तिथे येण्याआधी जेवढे वाहने काढून घेऊन जाता येतील तेवढे काढून घ्या नाहीतर जेवढी वाहने मिळतील तेवढे जप्त करण्यात येतील.येथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील' अशा आशयाची ऑडिओ क्लिप फेसबुक , व्हाट्सऍप आणि विविध समाज माध्यामाद्वारे व्हायरल होत आहे.
ही क्लिप कोणी व्हायरल केली?समोरील बोलणारा व्यक्ती कोण? या प्रकरणात अजून कोणा कोणाचा समावेश आहे?याची सविस्तर चौकशी डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडून केली जाणार आहे.