पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे नागरिकांना त्रास, केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर केंद्राने पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
देशात गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन वातावरण तापले आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले आहे. यामुळे सामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. पण आता केंद्र सरकारने यावर पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दरवाढीमुळे देशाच्या नागरिकांनी त्रास होत आहे, अशी कबुली दिली आहे. पण कोरोनामुळे कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढला आहे. त्यामुळे सरकार पैशांची बचत करत असल्याचे प्रधान यांनी सांगितले आहे.
"इंधन दरवाढीचा त्रास नागरिकांना होत आहे, हे मी मान्य करतो. पण कोरोनावरील लसीसाठी वर्षभरात 35 हजार कोटी खर्च झाले आहेत. गरिबांना 8 महिन्यांपर्यंत रेशन पुरवण्यासाठी प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेवर 1 लाख कोटींचा खर्च झाला आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत काही हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. या संकटकाळात आम्ही कल्याणाकारी योजनांसाठी पैशांची बचत करत आहोत," असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींनी सातत्याने इंधन दरवाढीवरुन मोदी सरकावर टीका केली आहे. त्याला प्रधान यांनी उत्तर दिले. "काँग्रेसशासित पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमध्ये इंधनाचे दर जास्त का आहेत याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे. जर त्यांना गरिबांचि खरंच काळजी असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी कर कमी करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना द्यावे ", असा टोला प्रधान यांनी लगावला आहे.