भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर ; आज पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर
मुंबई : देशभरात सुरु असलेली इंधन दरवाढ काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. ऐन दिवाळीत पेट्रोल आणि डिझेल दर नवनवे उच्चांक करत आहेत. अशातच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर ठेऊन नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. तब्बल सात दिवसांच्या दरवाढीनंतर इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेले हे दर आज दिवसभरासाठी लागू असणार आहेत. मात्र, इंधन दरवाढीला लागलेला हा ब्रेक कधीपर्यंत राहील हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115. 83 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रतिलीटर 106.59 रुपये एवढा आहे. तर दिल्लीत पेट्रोल 110.08 आणि डिझेल 98.44 रुपये प्रति लीटर आहे.
मागील दीड वर्षांपासून देशासह जगभरात कोरोनाचे संकट होते. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने, सर्वच उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी वाढली असून, दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कच्चे तेल महागल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.