मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील महाराष्ट्र दिनी होणारी सभा वादात सापडली आहे. सभेला परवानगी मिळण्यावरून वाद सुरू झाला होता.विविध संघटना यावर आक्षेप घेऊ लागल्या.याचपार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.हि याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठासमोर राज ठाकरेंच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेविरोधात याचिका दाखल केली होती. सभा रद्दच करण्यात यावी, अशी ठाम मागणी करतानाच सभा झालीच, तर पोलिसांच्या अटींचं काटेकोर पालन होणं आवश्यक असल्याची भूमिका जयकिशन कांबळे यांनी याचिकेमधून मांडली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.विशेष म्हणजे न्यायालयाने या प्रकरणामध्ये याचिकाकर्त्याला एक लाखांचा दंडही ठोठावला आहे.
याआधी भीम आर्मी संघटनेनं सुरवातीपासून राज ठाकरेंच्या सभेला विरोध दर्शवला आहे.आज सकाळी माध्यमांशी बोलताना भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी पुन्हा एकदा सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. १ तारखेला राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा आहे. ती सभा उधळून लावू या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. कालच आम्हाला कळलं की राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत" असं ते म्हणाले.