राष्ट्रीय कृषी बाजार योजनेमध्ये महाराष्ट्रातील 12 लाख शेतकऱ्यांचा सहभाग
मुंबई // राष्ट्रीय कृषी बाजार किंवा ई-नाम, ही भारत सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 12 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे, तर 257 शेती उत्पादक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. यामुळे देशातील कोणत्या बाजारपेठेत शेतीमालाचे काय दर आहेत याची माहिती शेतकऱ्यांना होते. तसेच शेतीमाल कोणत्या बाजारपेठेत विक्री करायचा हे देखील ठरविता येणार आहे.
केंद्र सरकारच्या अहवालानुसार, अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टलमध्ये 257 शेतकरी उत्पादक संघटना , 20339 व्यापारी आणि महाराष्ट्रातील 16 हजार 504 कमिशन एजंट सामील झालेत. राज्यात ई-नाम नेटवर्कशी 118 बाजार समित्या जोडल्या गेल्या असून, त्यापैकी 73 बाजारसमित्या या ऑनलाइन व्यवहार करीत आहेत. देशातील 21 राज्यांमधील शेतकरी या प्लॅटफॅार्मवर सामील झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी 14 एप्रिल 2016 मध्ये 21 बाजार समित्यांचा यात सहभाग नोंदवून 'ई-नाम' पोर्टंलचा शुभारंभ केला. यामुळे शेतकरी कोणत्याही बाजार समितीत पिकांची नोंदणी करुन शेतीमाल विक्री करु शकणार आहे. येथे नोंदणी केली म्हणजे त्याच बाजार समितीत शेती माल विक्री करावा असेही बंधन नाही. शेतीमाल विक्री करण्यापूर्वी शेतकरी कोणत्याही बाजारपेठेत दराची माहिती घेऊन माल विक्री करु शकतो. मोदी सरकारने आतापर्यंत 'ई-नाम' अंतर्गत देशात 1000 बाजार समित्यांची भर घातली आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात सुमारे 2 हजार 700 कृषी उत्पादन बाजार समित्या आणि 4 हजार उप बाजार समित्या ह्या पोर्टलवर नोंद आहेत.