बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळीतील वैद्यनाथ मंदिराच्या विश्वस्तांना एक पत्र आलं आहे. या पत्रात 50 लाख द्या. नाही तर मंदिर RDX उडवून देऊ. अशा धमकीचे पत्र एका अज्ञात व्यक्तीने पाठवले आहे. या अज्ञात व्यक्तीने 'मी फार मोठा नामी गुंड आहे. ड्रग्ज माफिया व गावठी पिस्तुलधारक आहे. मला तातडीची गरज भागवण्यासाठी 50 लाखांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्यावर रक्कम पोहोच करावी'. नाही तर मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील RDX ने उडवून देईल. अशी धमकी दिली आहे.
या पत्राच्या धमकीनंतर मंदीर विश्वस्तांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी मंदिर परिसराची सुरक्षा वाढवली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून भाविक येतात. मार्च 2020 पासून मंदिर कोव्हिडमुळे बंद होते. महिनाभरापूर्वी मंदिर उघडण्याचा निर्णय झाल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे.
शुक्रवारी विश्वस्तांना एक धमकीचे पत्र आले. या पत्रा नंतर खळबळ उडाली आहे. पत्रात संबंधित व्यक्तीने मंदिर विश्वस्तांना उद्देशून म्हटले आहे की, आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी मिळाली आहे. या धमकीच्या पत्राने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी मंदिर परिसरात सुरक्षा वाढवली आहे. तसेच धमकी दिलेल्या संबंधित व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.