उपसरपंच मुलापासून वाचवा वृध्द बापाची थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक- शारीरिक छळ करून घराबाहेर काढल्याचा प्रकार बुलडाण्यातील देऊळगाव माळी येथे घडला आहे.वृध्द दाम्पत्याने थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगावातील बाबासाहेब खेडकर या विकृत मुलानं आपल्या वृद्ध आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. ज्या मारहाणीत जन्मदात्या आईने जागेवरच जीव सोडला होता. असाच एक चिड आणणारा प्रकार आता बुलडाणा येथून समोर आला आहे. 'ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले , लग्नकार्य करून संसार थाटून दिले, त्या आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक- शारीरिक छळ करून घराबाहेर काढल्याचा प्रकार बुलडाण्यातील देऊळगाव माळी येथे घडला आहे. वृद्ध दांपत्याने बुलडाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तक्रारींचे निवेदन दिले आहे.
देऊळगाव माळी येथील परसराम फलके यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचा मोठा मुलगा विनोद फलके आपल्याला व आपल्या पत्नीला मारहाण करतो मानसिक त्रास देतो ,आम्हाला तुमचं काही घेणं नाही म्हणून घराबाहेर काढले अशी लेखी तक्रार केली आहे.
विशेष म्हणजे विनोद फलके हा गावातील माजी उपसरपंच आहे, त्याने त्यांची नावे असलेली घराची जागा ही स्व:तच्या नावे करुन घेत बँकेत ही काही कल्पना न देता कर्ज काढल्याचा आरोप या वृद्ध दाम्पत्याने केला आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटुन घटने संदर्भात तक्रार केली होती. मात्र विनोद फलके वर कोणतीच कारवाई न झाल्याने शेवटी या वृध्द दाम्पत्याने थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या वृध्द दाम्पत्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.