तृतीयपंथी बनून लुटणाऱ्या अट्टल भामट्याला पंतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
तुमच्या घरात संकट आले आहे, त्याचे निवारण मी करतो असे सांगून नागरिकांना तृतीयपंथी बनून लुटणाऱ्या अट्टल भामट्याला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जितुभाई जव्हेरभाई परमार असे या बोगस तृतीयपंथीचे नाव आहे. गेल्या वर्षी पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात असलेल्या दाणाभाई पटेल यांच्या घरी हा जितूभाई तृतीयपंथी बनून आला होता. घराबाहेर काळी फुल्ली मारून त्याने तुमच्यावर घोर संकट आले आहे असे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सांगितले. पाण्याच्या ग्लासमध्ये थोडी मिर्ची आणि मीठ टाकून आणा असे त्याने घरातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर त्याने ते पिऊन टाकून आपले संकट पिऊन टाकले आहे असे ही सांगितले. त्यानंतर घरातील कुटुंबीयांच्या अंगावरील प्रत्येकी एक असा सोन्याचा दागिना एका रुमालामध्ये ठेवण्यास सांगून तो रुमाल घेऊन मागे न पाहता चालण्यास त्याने सांगितले. नंतर हातातील रुमाल माझा हातात द्या आणि मागे न बघता चालत रहा असे सांगून सर्व सोने स्वतःकडे घेतले आणि मागच्या मागे पोबारा केला. तब्बल 9 तोळे सोने लुटून हा बोगस तृतीयपंथी फरार झाला होता.
मात्र पंतनगर पोलिसांनी वर्ष भर त्याचा शोध घेत अखेर त्याला बेड्या ठोकल्या. त्याचे मेडिकल केल्यानंतर तो तृतीयपंथीच नसल्याचे ही समोर आले आहे. या आरोपीने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणत असे गुन्हे केले आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील त्याने केलेले गुन्हे आता उघड होत आहेत.यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.