पंकजा मुंडे १२ डिसेंबरला कोणता 'संकल्प' करणार, कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Update: 2021-12-09 07:31 GMT

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली पक्षांतर्गत नाराजी वारंवार व्यक्त करुन दाखवली आहे. मुंबईत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आता कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी पंकजा मुंडे हे एक संकल्प करणार आहेत. त्यांचा संकल्प काय असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतोय याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं! तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतही नाही."प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायीक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले. अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले. अनेक दु:खी कुटुंबियांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील, सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात." "कोणत्याही नात्याविना इतकं प्रेक कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणाऱ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे, गुरू, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं!"

तर, या पत्राच्या शेवटी पंकजा मुंडे, "या 12 डिसेंबरला एक संकल्प घ्यावा म्हणते ऐकाल का ? सोपा आणि साधा संकल्प कराल का साध्य? " असे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या आहेत. त्यामुळं पंकजा मुंडे नेमका काय संकल्प करणार? त्यांनी कोणता संकल्प करण्यास समर्थकांना आवाहन केलं आहे, हे अस्पष्ट असल्याने समर्थकांसह राजकीय वर्तुळात, कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या 13 डिसेंबर रोजी हे स्पष्ट होणार असून नेमकं पंकजा मुंडे काय संकल्प जाहीर करताता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Similar News