Lockdown: फडणवीस म्हणाले लोक रस्त्यावर उतरतील, पंकजा म्हणाल्या पर्याय काय?
सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत उपस्थित असलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी "छोटे व्यवसायिक, रिटेलर्स, केशकर्तनालय आणि इतरही व्यवसायिक यांची भावना विचारात घ्यावी लागेल. कारण, सातत्याच्या आर्थिक संकटाने ते आता खचले आहेत. त्यांच्या समस्यांचा, विविध घटकांच्या आर्थिक संकटाचा विचार आता झाला नाही आणि आपण निर्बंध लावले, तर ते लोक पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि मग आपण काही करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना काही तरी मदत तातडीने द्यावी लागेल," असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी लॉकडाऊन बाबत पर्याय काय असा सवाल उपस्थित केला आहे.
'लॉकडाऊनमुळे जरी गरिबांची, व्यापाराची,अर्थव्यवस्थेची परिस्थिती कठीण होईल, तरी पर्याय काय आहे? कोरानाची साखळी कशी तोडणार? मजूर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणांवरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.' एकंदरींत फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांच्या विरोधात स्टॅंड घेतल्याचं दिसून येतंय.