आघाडी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत; मात्र हा निधी तात्काळ शेतकऱ्यांना द्यावा - पंकजा मुंडे

Update: 2021-10-13 12:31 GMT

आघाडी सरकारकडून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. या घोषणेचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वागत केले, परंतु हे पॅकेज दिल्यानंतर ते किती दिवसांमध्ये शेतकऱ्यांना देणार आहात? हे त्यांनी जाहीर करावं आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, त्या बरोबरच हे पॅकेज वाढवण्याची गरज असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आज भाजपकडून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी त्या बोलत होत्या.

या आंदोलनामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी नेतृत्व केलं. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान या आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला, 'रस्त्यावर उतरणाऱ्यांनी केंद्रातून किती पैसे आणले ते आधी सांगावं' या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर तुम्ही काय आणलं ते सांगा असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं. दरम्यान ज्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तिथे राज्य सरकार निधी देत नाही असा भाजप आमदारांचा आरोप आहे याबाबत बोलताना 'आमच्या सोडा त्यांच्याच लोकप्रतिनिधींना निधी कमी पडतो ते त्यामुळे सरकारने निधी वाढवून द्यावा' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Tags:    

Similar News