उस्मानाबाद : ऐकेकाळी उस्मानाबाद जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता , मात्र अनेक वर्ष पक्षातील नेत्यांनी पक्षांतर केल्याने एक नंबरचा पक्ष तीन ते चार नंबरला गेला. अशा भावना सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केली.
पक्षाला पुढील निवडणुकीत उभारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री संजय बनसोडे यांच्या उपास्थितीत जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्ह्यात आमदार , खासदार नसल्याने व वरिष्ठ नेते महाविकास आघाडीत जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय स्थानिक पातळीवर कळवत नसल्याने पक्ष पाठीमागे राहात असल्याचे त्यांनी सांगितले.
तर सत्तेत असतानाही व जे खाते पक्षाकडे आहे त्याचा तालुकास्तरीय अधिकारीसुध्दा केवळ पक्षीय पदाधिकाऱ्यांचा वचक नसल्याने सहकार्य करत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
मुरुम शहराध्यक्षांनी तर सरळ संपर्कमंत्री यांचे स्विय सहाय्याक कसुध्दा फोन घेत नसल्याची तक्रार केली . प्रमुख जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेत पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या जास्त असताना तत्कालीन नेत्यांनी स्वमर्जीचे सदस्य सत्तेत बसवले. आज ते राष्ट्रवादीचे सदस्य म्हणुन सांगतात मात्र काम पक्ष सोडलेल्या नेत्याचे करतात.पक्षाच्या बैठकीला येत नाहीत मात्र पक्ष दोन वर्षात त्यांच्यावर कार्यवाही करत नाही अशी तक्रार केली.
शेवटी संपर्क मंत्री संजय बनसोडे यांनी जिल्ह्यात घडलेल्या घडामोडी स्वतः पक्षप्रमुख शरद पवार यांच्या जिव्हारी लागल्याचे सांगत त्यांचे उस्मानाबाद जिल्ह्यावर खास लक्ष असुन आता गटबाजीला थारा नाही असे म्हणत एकदिलाने काम करण्याचा आदेश दिला.जेथे पक्षाची ताकत जास्त आहे व कार्यकर्त्याने विश्वास दिला तर महाविकास आघाडी न करता स्वबळावर लढण्याचे पक्षाचे धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले.