अहमदनगर :कोरोनाकाळात एकीकडे सख्खे नातेवाईक दूर जात असताना गरजू रुग्णांच्या मदतीला धावून जाणारे पारनेरचे आमदार म्हणजे राज्यातील 288 आमदारांपैकी एकमेव "अमिताभ बच्चन" आहेत, असं कीर्तनकार,'समाजप्रबोधनकार' निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी म्हटले आहे. काल (20 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजता आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या पारनेर येथील 'श्री शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर' या कोविड सेंटरमध्ये समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यावर कोरोना संकट आल्यानंतर राज्यातील इतर लोकप्रतिनिधी केवळ गप्पा मारण्यात व्यस्त होते, मात्र आमदार लंके यांनी थेट कृती करत हजारो कोरोना रुग्ण बरे करून घरी पाठवले. दरम्यान चांगले काम करणाऱ्यांना त्रास देखील असतो. ज्या बोरीला जास्त बोरं असतात तिलाच दगडांचा मारा सहन करावा लागतो असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
मोबाईल चित्रीकरण करणाऱ्यांना इंदुरीकर महाराजांनी बसवले खाली
दरम्यान नेहमीप्रमाणे इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सुरू असताना मोबाईल चित्रीकरण करणाऱ्यांना भर किर्तनात खाली बसवले. मागील काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांची एक वादग्रस्त वक्तव्य केलेली क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती, हे प्रकरण थेट न्यायालयात गेलं आहे. तेंव्हापासून इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनात चित्रीकरणावर जवळपास मज्जावच केला आहे.
तेंव्हापासून चांगलं काम करावं की नाही असा प्रश्न पडतो
दरम्यान आमदार लंके यांचे कौतुक करताना, "चांगल्याला चांगलं म्हटले पाहिजे मला कुठं त्यांच्याकडे तिकीट मागायचे आहे?" असं सांगत असतांना त्यांनी राजकिय व्यासपीठावर गेल्यानंतर काय काय त्रास सहन करावा याची आठवून करून दिली, वास्तविक मी पूरग्रस्तांना 1 लाख रुपयांची मदत घेऊन 'त्या' व्यासपीठावर गेलो होतो मात्र माध्यमांनी त्याचा वेगळाच अर्थ काढल्याचं म्हणत त्यांनी माध्यमांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.