#Omicron : कोरोनाचा नवा Variant किती चिंताजनक

Update: 2021-11-27 10:36 GMT

देशात कोरोनाचे संकट सौम्य झालेले असताना आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिय़न्ट Omicron हा चिंताजनक गटात मोडत असल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाचा नवा व्हेरियन्ट B.1.1.529. दक्षिण आफ्रिकेत आढळल्यानंतर तिथल्या तज्ञ्जांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा व्हेरायन्ट डेल्टापेक्षा (Delta variant) लवकरत संसर्ग पसरवणारा आहे. तसेच सध्या उपलब्ध असलेल्या लसी या व्हेरायन्टवर कमी परिणामकारक असल्याचेही सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या विविध व्हेरायन्ट्सची उत्पत्ती सुरूच असते. पण दक्षिण आफ्रिकेत आढळलेला हा व्हेरायन्ट तुलनेत जास्त घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्राथमिक अभ्यासानुसार B.1.1.529 व्हरायन्टचे म्युटेशन्स जास्त आहेत. दक्षिण आफ्रिकेत या नवीन व्हरायन्टमुळे दोन आठवड्यात रुग्णांची संख्या चौपट झाली आहे. कोरोनाचे विविध व्हरायन्ट शरिरात प्रवेश केल्यानंतर प्रतिकार शक्तीवर हल्ला करतात. पण या व्हरायन्टचा हल्ला किती तीव्र असू शकतो, याची संपूर्ण माहिती मिळाली नसल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

या व्हरायन्टचे अनेक म्युटेशन्स आहेत, त्यामुळे चिंता वाढली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Omicron व्हरायन्टची लक्षणं काय?

दक्षिण आफ्रिकेच्या संसर्गजन्य रोग प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, या व्हरायन्टची सध्या तरी कोणतीही वेगळी लक्षणं दिसलेली नाहीत. B.1.1.529 व्हरायन्टची बाधा झालेल्या काही रुग्णांमध्ये डेल्टा व्हरायन्टप्रमाणेच कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत.

नवीन व्हेरायन्टवर उपलब्ध लसी परिणामकारक आहेत का?

Omicron व्हेरायन्ट आणि सध्या उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतीबद्दल अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही. सध्या दक्षिण आफ्रिकेतील काही प्रयोगशाळांमध्ये B.1.1.529 हा नवीन व्हरायन्ट प्रतिकार शक्तीवर कसा परिणाम करतो याचा अभ्यास सुरु आहे. यातूनच सध्याच्या लसी यावर किती परिणामकारक ठरु शकतात याची माहिती उपलब्ध होऊ शकेल असे तेथील तज्ज्ञांनी सांगितले आहे. नियमित आरटीपीसीआर टेस्टमधूनही या व्हरायन्टची बाधा झाली आहे की नाही ते समजू शकणार आहे.

दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता लसीकरण हा यावरील प्रभावी उपाय आहे, त्यातही संसर्गाचा धोका जास्त असणाऱ्या लोकांना लसीकरणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडत नाहीये आणि त्यांच्या जीवाला धोकाही नसतो. तसेच जेवढे जास्त लसीकरण होईल तेवढा आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. त्याचबरोबर स्वच्छता, खेळती हवा, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क या गोष्टी महत्तवाच्या असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Tags:    

Similar News