खत विक्रेत्यांनी जुन्या खताचा साठा जुन्या दरानेच विक्री करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
खरिपाच्या तोंडावर खतांच्या किमती वरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये तुतु मैमै सुरु असताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जुन्या खतांची स्टॉप जुन्या दराने विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकारी काढत आहेत.;
मॅक्स महाराष्ट्रकडे संदर्भात परभणी जिल्हाधिकारी यांचा आदेश प्राप्त झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताच्या बॅगची खरेदी करतांना बॅगवरील किंमत व खत विक्रेत्याने बिलावर लावलेली किंमत, दर याची पडताळणी करुनच बॅगवरील किमतीपेक्षा जास्तीच्या दराने खताची खरेदी करु नये. खत विक्रेत्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला जुन्या दरातील रासायनिक खताचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा. असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
सद्या खरीप हंगाम 2021 सुरू होत असून पिकांना रासायनिक खताची मात्रा देण्यासाठी शेतकरी खत खरेदी करत आहेत. सध्या डीएपी 10:26:26, 20:20:00:13, 16:16:16, 12:32:16, 24:24:00, MOP इत्यादी रासायनिक खताच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परंतु विक्रेत्यांनी जुन्या खताचा साठा जुन्या दरानेच विकणे बंधनकारक आहे. असेही कळविले आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये खतांच्या किमती वरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून खतांच्या किमती कमी करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची जुन्या दराने खत विक्री चे आदेश म्हणजे एक प्रकारे खत किमतीमध्ये वाढ झाल्याची अप्रत्यक्ष कबुली असल्याचे 'मी शेतकरी आत्महत्या करणार नाही' अभियानचे अध्यक्ष माणिक कदम यांनी म्हटले आहे.