बोलण्याच्या रोखठोक शैलीमुळं अनेकदा चर्चेत राहणारे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका कार्यक्रमात असंच वक्तव्य केलंय. सध्या आमचं दुकान (भाजप) चांगलं सुरूय. आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी नाहीये. मात्र, जुने गिऱ्हाईक दिसत नाहीये, असं मिश्कील वक्तव्यं गडकरींनी केलंय. ते बुलढाणा इथं बोलत होते.
भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरूय. नवीन नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. यापार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी हाच धागा पकडून वरील वक्तव्य केलंय. गडकरी म्हणाले, “ जेव्हा दुकान चालायला लागतं, तेव्हा गिऱ्हाईकांची कमी नसते. आता आमचं दुकान चांगलं सुरूय. गिऱ्हाईकांची कमी नाहीये, मात्र जुने गिऱ्हाईक कुठे दिसत नाहीये, असं मिश्कील वक्तव्य गडकरींनी करत जुने-नवीन कार्यकर्ते यांना सूचक इशाराही दिलाय.
गडकरी पुढे म्हणाले, “ माझ्यासारख्या लोकांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे की, आजचा जो दिवस आम्हाला पाहायला मिळाला तो केवळ आमच्या कर्तुत्वामुळे नाही. असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात आणीबाणीत दोन दोन वर्षे तुरुंगवास सहन केला. अनेक संकटं झेलली, अनेक आंदोलनं केली. पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. अशा अनेक लोकांच्या तपश्चर्येतून, बलिदानातून आम्ही सत्तेत पोहचलो आहोत,” असं भावनिक मतही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलंय.