अंमलदारांना होता येणार पोलिस उपनिरीक्षक;प्रस्तावित निर्णयाला तत्वतः मान्यता

Update: 2021-10-15 02:37 GMT

निशस्त्र पोलिस शिपाई पदावरील अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पदोन्नतीची संधी गृह विभागाकडून देण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्तावित निर्णयाला तत्वतः मान्यता दिली आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच होणार आहे.याबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, पदोन्नतीसाठी लागणारा कालावधी दीर्घ असल्याने बहुतांश अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. पोलिस शिपाई पदावरील अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक या अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता यावे म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत आहे.

या निर्णयामुळे १५,१५० अंमलदारांना पदोन्नतीच्या संधी त्वरित प्राप्त होणार आहेत. पोलिस दलामध्ये तपासी अंमलदारांच्या संख्येमध्ये पोलिस हवालदार ५१,२१०, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक १७,०७१ अशी भरीव वाढ होऊन प्रत्येक पोलिस स्थानकाकरिता १३ अतिरिक्त अंमलदार गुन्हे कामकाजासाठी उपलब्ध होणार आहेत.

त्यामुळे गुन्हे विषयक तपासामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. सोबतच कार्यक्षमतेत वाढ झाल्याने पोलिस दलासाठी सद्य स्थितीत प्रत्यक्ष कामकाजासाठी मिळणारे २३,२८,७०,००० इतक्या मानवी दिवसांमध्ये ६६,७४,९३,७५० इतकी वाढ होणार आहे. ही वाढ सुमारे २.८७ पट इतकी आहे. या प्रस्तावित निर्णयाने पदोन्नतीतील विलंब दूर करून पोलिसांचे नीतिधैर्य उंचावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्ह्यांची उकल, सामान्य नागरिकांची मदत यात अधिक सुलभता येऊन पोलिस दलाची प्रतिमा वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News