भाजपच्या काही नेत्यांना आजकाल दैवी साक्षात्कार होऊ लागला आहे - महेश तपासे

Update: 2022-03-20 13:31 GMT

भाजपच्या काही नेत्यांना आजकाल दैवी साक्षात्कार होऊ लागलाय का? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांना दोषी ठरवण्याचे काम भाजपच्या काही नेत्यांकडून केले जात आहे यावर महेश तपासे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी शिवसेना भवनाच्या बाहेर बॉम्बस्फोट घडवला असे हास्यास्पद विधान भाजपच्या एका आमदार भगिनीने केले असून त्याचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नवाब मलिकांवर असा आरोप शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व नंतरच्या काळामध्ये भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केला नव्हता किंवा मुंबई एटीएस व एनआयए या यंत्रणांनीसुद्धा केला नव्हता असेही महेश तपासे म्हणाले.

मालेगावचा बॉम्बस्फोट कुणी घडवून आणला याबाबतदेखील आमदार भगिनीने दैवी साक्षात्काराच्या माध्यमातून मुंबई एटीएस व एनआयए या यंत्रणांना अवगत करावे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे. आपणच आरोप करायचे... पुरावे द्यायचे नाही आणि आपणच एखाद्याला दोषी ठरवायचं अशी हास्यास्पद भूमिका भाजपचे काही नेते घेताना दिसत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

Tags:    

Similar News