अँटेलिया स्फोटक प्रकरणात चांदिवाल आयोगाची मंत्री नवाब मलिक यांना नोटीस
अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नवाब मलिक यांना न्यायमुर्ती कैलास चांदिवाल आयोगाने नोटीस बजावली आहे.;
प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबाणी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ जिलेटीनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे आणि परमबीर सिंह हे सुत्रधार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी अनिल देशमुख यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता, असा दावा सचिन वाझे यांचे वकिल नायडू यांनी केला. मात्र नवाब मलिक यांनी केलेले विधान त्यांच्या अंगलट आले आहे. तर त्या विधानामुळे न्यायमुर्ती कैलास चांदिवाल आयोगाने नवाब मलिक यांना नोटीस बजावली आहे. तर 17 फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
तात्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या विधानाच्या आधारे आपण विधान करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले होते. मात्र नवाब मलिक यांनी केलेल्या विधानामुळे सचिन वाझे यांची बदनामी झाली आहे. तसेच सचिन वाझे यांची प्रतिमा मलिन झाली आहे, असा दावा सचिन वाझे यांचे वकील नायडू यांनी केला. त्यामुळे नवाब मलिक यांच्या कथीत विधानामुळे न्यायमुर्ती कैलास चांदिवाल आयोगाने अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना नोटीस बजावली आहे.
त्यानुसार 17 फेब्रुवारी रोजी मंत्री नवाब मलिक हे आयोगासमोर आपली बाजू मांडतील. मात्र अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.