शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही - बाळा नांदगावकर
राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले.आता तर वीजबिल माफ करणार नसल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. ठाकरे बोलल्यानंतर पवारसाहेब म्हणाले होते, राज्य सरकारशी बोलतो. पण मला वाटतं पवारसाहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.;
बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाढीव वीजबिला विरोधात मनसेच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील जनतेला वाढीव बिलाचा शॉक बसल्यानंतर मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटले, त्याशिवाय ऊर्जा सचिव, बीएमसी अधिकाऱ्यांना भेटले. अदाणी ग्रुपचे अधिकारी राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरे स्वत: राज्यपालांना भेटले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदनं मागवली. आम्ही ही निवेदनं दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला गेला नाही. आता तर वीजबिल माफ करणार नसल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला विश्वास आहे, पवारसाहेबांच, कारण राज ठाकरे बोलल्यानंतर पवारसाहेब म्हणाले होते, राज्य सरकारशी बोलतो. पण मला वाटतं पवारसाहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही, असं नांदगावकर म्हणाले.
राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले. सरकारने वाढीव बील माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांना निवेदनं दिली. पण वीजबिल माफ झाली नाही. उलट ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवून महाराष्ट्राचा घोर अपमान केला. त्यामुळे राज्यातील जनतेची फसवणूक झाली असून जनतेत संतापाची भावना आहे.
त्यामुळे आम्ही सरकारला येत्या सोमवारपर्यंत वीजबिल माफ करण्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर वीजबिल माफ नाही केलं तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात उग्र आंदोलनं होतील. लोकांचा संयम सुटला आहे. पब्लिक क्राय झाल्यास त्याला जबाबदार सरकारच असेल, असं सांगतानाच कुणाची वीज कापल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.